एक मिनिट, एक क्षणही वाया घालवला नाही, म्हणूनच… एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला

4 hours ago 1

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 23 जानेवारी विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावेळी जोरदार भाषण केले. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला. तोच विजयोत्सव आपण साजरा करत आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

माझ्या आगोदर कोणी तरी भाषण करेल असं वाटलं होतं. पण एकट्याला बॅटिंग करायला ठेवलं. हा भाषणाचा कार्यक्रम नाहीच. आपण आज विजयोत्सव साजरा करत आहोत. विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला. कारण बाळासाहेबांच्या प्रेरणेने घडलेले आपण शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला. तोच विजयोत्सव आपण साजरा करत आहोत. अडीच वर्षापूर्वी केलेला उठाव आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा आहे. अनेक पिढ्या या विजयाची नोंद ठेवल्या शिवाय राहणार नाही. हे यश बाळासाहेबांच्या विचाराचं आहे. महायुतीच्या एकजुटीचं आहे. अडीच वर्ष रात्र न् दिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं, लाडक्या बहिणीचं, भावांचं, ज्येष्ठांचं, तरुणांचं आणि शेतकऱ्यांचे हे यश आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दोन अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केलं. एकही क्षण आपण वाया घालवला नाही. म्हणूनच विजय मिळाला. विकास कामे चौपट पटीने केली. लोकाभिमूख योजना केल्या आणि विकासही केला. दोन्हीची सांगड घातली. त्यामुळेच राज्यातील जनतेने विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं हे मोठं गिफ्ट आहे. बाळासाहेब असते तर आज आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आले तर घरी आल्यावर आई उंबरठ्यावर आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद माझ्या मनाला झाला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला. साथ दिली. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article