राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावरुन संशियत आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधला. “विजय शिवतारे यांना राज्याच्या गृहमंत्र्यांविषयी काही म्हणायचे नाही का? फक्त अजितदादांच्या पक्षातील एका नेत्याचे नाव येतं तोपर्यंत इथे विषय थांबत नाही. मात्र एखादा गुन्हेगार व्हिडिओ करून शरण येतो म्हणजे तो यंत्रणेवर उपकार करतो का? यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश नाहीये का? सोयीने आरोप करण्यापेक्षा या घटनेचे मुळ पाहिलं पाहिजे. ही एक हत्या आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण आणायला नको”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“बीडमधील प्रकरणात या आरोपींना कोणी राजकीय व्यक्ती जर पाठिंबा देत असेल त्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्यातच बीड जिल्ह्यातील राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांचे नाव जर सातत्याने समोर येत असेल तर त्यांनी नैतिकतेने राजीनामा देणे गरजेचे आहे. मात्र, राजीनामा न देता या गोष्टी अशाच पुढ नेल्या जात असल्याने कोणाला पाठीशी घातलं जातोय का? ही शंका येत आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे यांचं आशिष शेलार यांना प्रत्युत्तर
अमोल कोल्हे यांनी आशिष शेलार यांच्याही टीकेला प्रत्युत्तर दिलं. “आशिष शेलार यांना विसर पडला असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांचं कौतुक केलं आहे. भाजपच्या सरकारने कृषी क्षेत्राच्या योगदानासाठी शरद पवार यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार देवून कौतुक केले”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
हे सुद्धा वाचा
‘नाव आले तर राजीनामा घ्यावाच लागणार’
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आले तर राजीनामा घ्यावाच लागणार. यामधे नैतिकता येतच नाही. चौकशी निष्पक्ष व्हावी. यासाठी दिलेला राजीनामा हा नैतिकतेचा राजीनामा असतो. अजितदादा जे बोलतात ते कारवाईची गोष्ट आहे. त्यांना कारवाई करावी लागणार आहे, जी मागणी केली जाते ती नैतिकतेच्या प्रश्नावरती केली जात आहे”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
“केंद्रीय गृहमंत्र्यांनी येथील राजकारणावर भाष्य करण्यापेक्षा बीड प्रकरणातील संतोष देशमुख हत्या केलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही निर्देश दिले आहेत का? सोमनाथ सूर्यवंशी यांची कोठडीत हत्या केली, असा आरोप होतोय. याबाबत जसे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राज धर्म का पालन करो असे गुजरातमध्ये सांगितले होते. तसे अताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता मुख्यमंत्र्यांना सांगणार का? हे पाहावे लागणार आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.