Published on
:
23 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
23 Nov 2024, 1:10 am
खेड : कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात ‘कदम विरुद्ध कदम अशा निर्णायक लढतीचे संकेत निवडणुकीपूर्वी मिळत होते. शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीतून ठाकरे गटात दाखल झालेले उमेदवार माजी आमदार, संजय कदम यांनी मोठे आव्हान उभे केले होते. या मतदारसंघात योगेश कदम यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांनी देखील निकालाआधीच जल्लोष करून आपला विजय निश्चित असून पोलिसांचा रिपोर्ट शासनाकडे गेला आहे, असे म्हणत उत्कंठा वाढवली आहे.
या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता त्यामुळे वाढली आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. मात्र, हा वाढलेला टक्का कोणत्या उमेदवाराला विजयी रथापर्यंत नेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोकणात दापोली मतदारसंघात शिवसेना भाजपामधील वाद हे सर्वश्रुत होते. मात्र, निवडणुकीच्या दरम्यानच मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ते मिटवण्यात आले होते. त्यामुळे महायुतीने एकत्र काम केले होते. पण असे असले तरीही महायुतीमधीलच भाजपचे काही पदाधिकारी यांनी मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्या विरोधातच भूमिका घेतल्याची उघड चर्चा सुरू असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या संजय कदम यांना बळ मिळाल्याचे म्हटले जाते. दापोली विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला असून या ठिकाणी ‘कदम विरुद्ध कदम’ अशी निर्णायक लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.(Maharashtra assembly polls)
महायुतीमधील वाद मिटल्यानंतर भाजपाचे दापोलीतील नेते जिल्हाध्यक्ष केदार साठे व त्यांच्या सहकार्यांनी सक्रिय काम केल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या निवडणुकीत आपली यंत्रणा महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या विजयासाठी कार्यरत केली होती.
मनसेने देखील संतोष अबगुल यांच्या रुपाने तरुण उमेदवार दिला होता. त्यांना किती मते मिळतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांनी प्रचारात विकासकामे, पर्यटन विकास, उद्योग व रोजगार या विषयाचा समावेश केला होता. तर संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करत गद्दार हा प्रमुख मुद्दा घेऊन प्रचारात रस्त्यांची दुरवस्था व अपूर्ण प्रकल्प यांना जनते समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.(Maharashtra assembly polls)
दापोली, खेड, मंडणगड, विधानसभा मतदारसंघात अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूने साम, दाम यांचा वापर करून काही गणिते फिरवल्याची चर्चा सुरू आहे. काहींनी आपले राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी एका रात्रीत सोयीने गणिते मांडल्याची चर्चा मतदारसंघात जोरदापणे सुरू आहेत.