कात्रज-कोंढवा रस्त्यावर होणारी सततची वाहतूक कोंडी.pudhari
Published on
:
28 Nov 2024, 9:15 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:15 am
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असून आता पुन्हा हा रस्ता 84 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे तोडगा निघाला आहे. सध्या रस्ता रुदीकरणाच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असून, प्रथमतः 50 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्त्याचे काम भूसंपादनामुळे रखडले आहे. अवघ्या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी तब्बल 710 कोटींचा खर्च येणार असल्याने गेल्या पाच वर्षांत अवघे एक किलोमीटरचे काम टप्प्याटप्प्यामध्ये झाले आहे. यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने रस्त्याची रुंदी 84 वरून 50 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. रुंदी कमी केल्याने भूसंपादनासाठी 277 कोटी लागणार आहेत. यापैक 140 कोटी राज्य सरकारने दिले आहेत. या निधीचे जागामालकांना वाटप केले जाणार आहे. काही भागांत काम झाले असून, ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. जेथे जागा ताब्यात आल्या तेथे रस्ता बांधला जात आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्याची रुंदी 84 मीटर करावी, अशी सूचना केली होती. त्या सूचनेनुसार हा रस्ता 84 मीटर रुंदीचा केला जाणार आहे. भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवश्यक ती प्रक्रिया केली जाणार आहे. रस्त्याची रुंदी 84 मीटर करणासाठी सुमारे 17 हजार 200 चौरसमीटर जागा आवश्यक आहे. त्या जागेच्या नुकसानभरपाईच्या मोबदल्यात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यातील तीस टक्के रक्कम महापालिका देईल, असे आयुक्त डॉ. भोसले यांनी नमूद केले. तसेच प्रथम हा रस्ता 50 मीटर रुंद करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.