मनसेच्या बैठकीत बोलताना माजी आमदार राजू पाटील. Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 3:08 pm
Updated on
:
23 Jan 2025, 3:08 pm
नेवाळी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता मनसे सक्रिय होताना दिसून येत आहे. विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील होते. परंतू नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा देखील पराभव झाला. त्यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. विधानसभा निवडणुकी नंतर मनसेचे कल्याण डोंबिवलीतील महाराष्ट्र सैनिक शांत झाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या मनसेच्या बैठकीत माजी आमदार राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीसंदर्भात कानमंत्र दिला आहे. तसेच यावेळी अधिकारी ऐकत नसतील तर बिनधास्त ठोकून काढा, असा वादग्रस्त सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी या संदर्भात मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली आहे. आगामी वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात, त्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागा. असे सांगितले. त्यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. चक्क मनसेचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सांगितल आहे, की काम होत नसतील तर अधिकाऱ्यांना बिनधास्त ठोकून काढा. यावेळी त्यांनी कलम ३५३ चा दाखला देखील दिला आहे.
या बैठकीला मनसेच्या महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेडणेकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर,जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील , अनंता म्हात्रे , जिल्हा संघटक हर्षद पाटील , डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत , विधानसभा सचिव अरुण जांभळे यांसह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.