Published on
:
21 Jan 2025, 12:35 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:35 am
कुडाळ : कुडाळ नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी गटातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सई देवानंद काळप आणि विरोधी भाजप गटातर्फे नगरसेविका प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर या दोघांनी सोमवारी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. छाननी प्रतिक्रियेत दोन्ही नामनिर्देशनपत्र वैध ठरले. शुक्रवार 24 जानेवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.
या न.पं. ची नगरसेवक संख्या 17 असून सत्ताधारी महाविकास आघाडीचे 9 आणि विरोधी भाजप गटाचे 8 असे पक्षीय बलाबल आहे. दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष पदाचा दावा करण्यात आला आहे. या निवडणूक पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेची एक नगरसेविका नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होणार हे निश्चित आहे.
कुडाळ नगरपंचायतीत सध्या शिवसेना (उबाठा) व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. दोन्ही पक्षात ठरलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांनी नुकताच नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुडाळ नगराध्यक्ष निवड कार्यक्रम जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला आहे. सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळी मविआ तर्फे उबाठा शिवसेनेच्या नगरसेविका सई काळप आणि विरोधी भाजपतर्फे प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या दोघांनी नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे सादर केले. सई काळप यांच्यासमवेत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा न.पं.गटनेते मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे आदी उपस्थित होते. तर प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासमवेत गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी व अॅड.राजीव कुडाळकर आदी उपस्थित होते.
पीठासीन अधिकारी तथा प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. दोन्ही नामनिर्देशनपत्र वैध ठरल्याचे पीठासीन अधिकार्यांनी घोषित केले. गुरूवार 23 जानेवारी रोजी सायं. 4 वा.पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे तर शुक्रवार 24 रोजी स.11 वा. विशेष सभेच्या सुरूवातीला निवडणूक लढविणार्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करणे, त्यानंतर बाब क्र. 7 प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान व पीठासीन प्राधिकार्यांमार्फत निकाल घोषित करणे असा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला आहे.
ठाकरे गटाची एक नगरसेविका नॉट रिचेबल
कुडाळ न. पं.ची नगरसेवक संख्या 17 आहे. यात ठाकरे शिवसेनेचे 7, राष्ट्रीय काँग्रेसचे 2 मिळून मविआचे 9 आणि भाजपचे 8 नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. आता शिवसेनेच्या नगरसेविका सई काळप यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. उपनगराध्यक्षपदी ठाकरे शिवसेनेचे किरण शिंदे कार्यरत आहेत. मात्र ठाकरे शिवसेनेची एक नगरसेविका नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्तेसाठी भाजपची नगरसेवक संख्या काठावर असून एका नगरसेवकाचे मत महत्त्वपूर्ण आहे. राज्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत काय राजकीय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.