Published on
:
24 Jan 2025, 1:30 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:30 am
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आह. मविआकडून शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सौ. सई देवानंद काळप तर विरोधी महायुतीकडून भाजपच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मविआमधील एक नगरसेविका महायुतीच्या गळाला लागली असल्याची चर्चा असल्यामुळे कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणूक रंगतदार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडणार? नगराध्यक्ष मविआ की महायुतीचा होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कुडाळ नगरपंचायतीत सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. दोन्ही पक्षात ठरलेल्या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकार्यांनी जाहिर केला. सोमवारी 20 जानेवारीला नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी गटातर्फे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सौ. सई काळप तर महायुतीकडून भाजपच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या दोघांनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे सादर केले. यावेळी पीठासीन अधिकारी तथा प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या उमेदवार अर्जाच्या छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले असून शुक्रवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे.
या पार्श्वभूमीवर मविआ कडून गटनेते मंदार शिरसाट तर महायुतीकडून गटनेते विलास कुडाळकर यांनी आपआपल्या नगरसेवकांना व्हिप बजावत नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत आपल्याच उमेदवाराला मतदान करा,असे आवाहन केले आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात 22 जानेवारी रात्रौ 12 वा.पासून ते 25 जानेवारी रोजी रात्रौ 12 वा. पर्यंत कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे. तसेच 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.पासून मतमोजणी होईपर्यंत शंभर मीटर परिसरातील खाजगी आस्थापने बंद ठेवण्यात यावीत तसेच या काळात शंभर मीटर परिसरात मिरवणूक, गर्दी करणे व घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मविआ व महायुतीचे असे आहे संख्याबळ
कुडाळ नगरपंचायतची नगरसेवक संख्या 17 आहे. यामध्ये ठाकरे शिवसेनेचे 7, राष्ट्रीय काँग्रेसचे 2 मिळून महाविकास आघाडीचे 9 तर भाजपचे 8 नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. केवळ 1 नगरसेवक नगराध्यक्ष ठरवू शकतो. त्यातच ठाकरे गटाच्या एक नगरसेविका नॉटरिचेबल असल्यामुळे कुडाळ नगराध्यक्ष निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.