आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदेFile Photo
Published on
:
23 Nov 2024, 12:55 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:55 am
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदेंमध्येच हाय व्होल्टेज लढाई झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेपेक्षा तब्बल 10 टक्के मतदान वाढले आहे. इतके वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार अन् कुणाला धक्का देणार याची चर्चा सुरू आहे. आज मतमोजणी होत असून कोरेगावचा सिकंदर कोण? याचा फैसला होणार आहे. मतदार आ. महेश शिंदेंना साथ देतात की आ. शशिकांत शिंदेची सोबत करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
या मतदारसंघात 17 जण रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे यांच्यातच टफ फाईट होत आहे. प्रचारादरम्यान आ. महेश शिंदे यांनी विकासकामे तर आ. शशिकांत शिंदे यांनी दडपशाही या मुद्द्यांवर जोर दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आज दोन्ही उमेदवारांसाठी महत्वाचा दिवस असल्याने कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये 12 अपक्ष आहेत. महेश शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या सभेनेच आपला प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी प्रचारादरम्यान सर्व विकासकामांचा लेखाजोखा मतदारसंघात मांडून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे, तर आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कोरेगावात सभा घेतली.
त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात तुल्यबळ लढत होऊन जिल्ह्यासह राज्यात लक्षवेधी बनला आहे. आ. महेश शिंदे व आ. शशिकांत शिंदे यांच्यात टफ फाईट झाली आहे. मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वाधिक 77.76 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा 10 टक्के मतदान वाढल्याने हे मतदान कुणाला साथ देणार अन् कुणाला दगा फटका होणार? याचा फैसला आज होत आहे. सर्वत्र घासून नव्हे, तर ठासून म्हटले जात असले तरी कोरेगाव मतदारसंघात कट टू कट घासूनच लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हावासायांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.