चित्रा वाघ
Published on
:
03 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:35 am
मिरज : सराफांसाठी क्लस्टर उभे व्हावे, अशी मागणी आहे. त्यानुसार क्लस्टर उभारण्यासाठी आमचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. हे क्लस्टर कोल्हापूर जिल्ह्यात व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, आमदार चित्रा वाघ यांनी रविवारी मिरजेत पत्रकार बैठकीत दिली.
वाघ म्हणाल्या, गोल्ड व्हॅल्युअर संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मी आले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे. जुन्या भारतीय दंडसंहिता कलम 411 मुळे सराफ व्यावसायिकांना त्रास होत होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे नवा कायदा व परिपत्रक काढण्यात आले आहे. ते सराफांना सुरक्षा आणि संरक्षण देणारे आहे. राज्याच्या व जिल्ह्याच्या दक्षता समितीवर व्यापार्यांचाही समावेश व्हावा, अशी आमची मागणी आहे. व्यवसायातून झालेल्या त्रासामुळे काही सराफांनी यापूर्वी आत्महत्या केली आहे. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्हाला वसुली अधिकारी नको, तर तपास अधिकारी पाहिजे आहेत. सराफांकडे असलेल्या कारागिरांच्या कलेला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी क्लस्टर उभे करण्याचीही गरज आहे. सराफांसाठीचे असे क्लस्टर भारतात कोठेही नाही. असे क्लस्टर कोल्हापूरमध्ये सुरू व्हावे, अशी मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.