कोल्हापूर : जिल्हा न्यायालय संकुलातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील बाजूचे चंदनाचे झाड तोडून सुमारे 20 हजार रुपये किमतीच्या चंदनाची चोरी करणार्या आंतरराज्य टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कर्नाटकातील रायबाग येथे छापा टाकून जेरबंद केले. अटक केलेल्यांत एका बाल संशयिताचा समावेश आहे. अन्य फरारी संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके मध्य प्रदेशकडे रवाना झाली आहेत.
करण ऊर्फ समुसलाल सरायलाल पवार ऊर्फ पारधी (वय 55), रुलबाबू सरायलाल पवार ऊर्फ पारधी (20, रा. हरदुवा, जि. कटणी, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फरारी असलेल्या दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. 5 जणांच्या टोळीत एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, नवी दिल्ली, आंध—सह देशभर भटकंती करणारी आंतरराज्य टोळी प्रथमच कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. मुख्य सूत्रधार असलेले फरारी पोलिसांच्या हाताला लागल्यानंतर घरफोडी, चोरीसह अन्य गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. न्यायालय आवारातून चोरी झालेल्या चंदनाची सोलापूर जिल्ह्यात विक्री झाल्याचेही चौकशीत उघडकीस आले आहे. चंदनाचे झाड विकत घेणार्यालाही सहआरोपी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालय परिसरात कृष्णा इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेले आणि पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या वृक्षाची दि. 20 ते 21 जानेवारी 2024 यादरम्यान अनोळखी चोरट्यांकडून चोरी झाली. न्यायालय परिसरात हा प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली होती. न्यायालयीन कर्मचारी चेतन तानाजी जाधव यांनी अनोळखी चोरट्यांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकालाही समांतर चौकशीचे आदेश दिले होते. पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, अमित सर्जे, महेश खोत यांच्या चौकशीत मध्य प्रदेशातून भटकंती करणार्या टोळीचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातही दाखल झाले. आरोपींची नावे निष्पन्न झाली; पण प्रत्यक्षात त्यांचा सुगावा लागला नाही.
फरारी संशयितांची नावे निष्पन्न
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पहाटे कर्नाटकातील रायबाग येथे छापा टाकून बाल संशयितासह तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय, अन्य दोघांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. फरार संशयित टोळीचे मुख्य संशयित असल्याची कबुलीही करण ऊर्फ समुसलाल याने दिली आहे, असेही तपास अधिकारी कळमकर यांनी सांगितले. अतिश म्हेत्रे, अमोल कोळेकर, हिंदुराव केसरे, महेश गुरव, सुरेश राठोड, सोमराज पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
सहायक फौजदारासह 3 पोलिस निलंबित
बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या तीन पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई केली. सहायक फौजदार जकरिया नूरमहम्मद इनामदार, पोलिस नाईक संतोष हरी पाटील, पोलिस शिपाई विजयकुमार मारुती जाधव यांचा निलंबन झालेल्यांमध्ये समावेश आहे.