स्मॉल कमिटीत तीन जणांना घेण्याची मागणी करणार; आमदार विजय शिवतारे यांची माहिती File Photo
Published on
:
31 Jan 2025, 4:02 am
Updated on
:
31 Jan 2025, 4:02 am
पुणे: मला डीपीडीसीच्या कमिटीवरून काढण्यात आले, हा गैरसमज झाला आहे. खासदार, आमदार हे या कमिटीचे सदस्य असतात. स्मॉल कमिटीमध्ये फक्त आता मी नाही. स्मॉल कमिटीमध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतले जाते. मी शिवसेनेचा एकटाच आमदार आहे. स्मॉल कमिटीमध्ये दोनच आमदारांना घेता येते. त्यामुळे या दोघांना घेण्यात आले आहे.
मी तीन जणांना घेण्याची मागणी करणार आहे, असे आमदार विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विधानभवनमध्ये आयोजित केलेल्या बैठकीसाठी आमदार विजय शिवतारे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवतारे म्हणाले, स्मॉल कमिटी गठित केलेली आहे. विभागीय आयुक्तांनी केलेले आराखडे स्मॉल कमिटीमध्ये जात असतात. मीही सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो.
मीही स्मॉल कमिटी घटित केली होती. यापूर्वी स्मॉल कमिटी घटित करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना होते. यंदा हे पहिल्यांदाच प्रशासकीय पातळीवर झाले. सर्व अधिकार बाय डिफॉल्ट जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतात. जिल्हा परिषदेचे सदस्य सध्या नाहीत, त्यामुळे निमंत्रित सदस्य नेमले जातात, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, मला डीपीडीसीमधून काढले, असे काही झालेले नाही. सगळे आमदार, खासदार डीपीडीसीमध्ये सदस्य आहेत.
या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. स्मॉल कमिटीमध्ये त्यांच्या झालेल्या निवडीबाबत ते म्हणाले, डीपीडीसीमध्ये दोन सदस्य आहेत, त्यात माझी नेमणूक केली आहे. काल सरकारकडून मला निमंत्रित केले होते. कायद्यात दोन जणांची नेमणूक करण्याची तरतूद असते. त्याप्रमाणे माझी नेमणूक करण्यात आली आहे.
या वेळी पत्रकारांशी बोलताना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणाले, जिल्ह्यातील विविध विषय आहेत. यावर बैठकीत चर्चा झाली, जीबीएस आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. जास्तीत जास्त पाणी उकळून प्यावे. सरकारने या आजारावर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालये सुचविली आहेत. त्या रुग्णालयात जाऊन नागरिकांनी या आजारावर उपचार घ्यावेत. उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत. शिवसेनेचा विचार व्हावा, शिवरायांच्या जन्मस्थळाचा विसर पडतोय. मात्र, असे होणार नाही. शिवनेरीचा विचार तीनही पक्ष करतील, पक्षांनी समन्वय ठेवून कामे करावीत. पालकमंत्री हेच अर्थमंत्री असल्यामुळे पुण्याला निधीबाबत प्राधान्य देतील.
सोनवणे म्हणाले, राष्ट्रवादी, भाजपप्रमाणे शिवसेनेचा विचार होणे गरजेचे आहे. किल्ले शिवनेरी भागाला मंत्रिमंडळात सामावून घेतले नाही. शिवरायांचे नाव घेऊन सरकार येते; पण त्यांच्या जन्मस्थळाला डावलले जाते. किल्ले शिवनेरीला मंत्रिपदाची आशा आहे. सरकार येत्या काळात शिवनेरीचा विचार करतील, अशी अपेक्षा आहे. सेनेवर अन्याय करू नये; अन्यथा महाराष्ट्र पुन्हा अस्थिर होईल.