कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

02 Oct 2024, 6:23 am

Updated on

02 Oct 2024, 6:23 am

राजकीय विद्यापीठ कागलचा लौकिक कायम आहे. मंडलिक घाटगे यांच्यातील टोकाच्या संघर्षानंतर आता गेल्या निवडणुकीपासून हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राजकारणातले वस्ताद शरद पवार यांचे हिंदकेसरी असा हसन मुश्रीफ यांचा, तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असा घाटगे यांचा लौकिक. मात्र, त्यांनी आपले नेतेच आता बदलले आहेत. घाटगे यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले शरद पवार है समरजित घाटगे यांचे कौतुक करायला कागलच्या गैबी चौकात आले. (Assembly Election 2024)

तर आता भाजपच्या नेत्यांकडून हसन मुश्रीफ यांचा प्रचार केला जाणार आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय भूमिकेत कागलकर कोणाला साथ देणार? उमेदवार मात्र कागल, उत्तुर, गडहिंग्लज ते पुण्या-मुंबईपर्यंत जाऊन मतदारांना साकडे घालत आहेत. पक्षाचे जागावाटप अधिकृतरीत्या जाहीर होण्यापूर्वीच मतदारांचा चिन्हासह प्रचार सुरू झाला आहे. मुश्रीफ यांच्यामागे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची, तर घाटगे यांच्या मागे शाहू साखर कारखान्याची ताकद आहे. जिल्हा बँकेवर मुश्रीफ यांची सत्ता आहे.

कोल्हापूर दक्षिणला उमेदवार फायनल असतात आणि तेच आपला पक्षही फायनल करत असतात. एरव्ही मतदार संघात पक्ष उमेदवार ठरवितात व त्यांच्या नावाची घोषणा करतात. मात्र, येथे उमेदवार कायम असतात आणि तेच आपण कोणत्या पक्षातून लढायचे, हे ठरवितात, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची ही युद्धभूमी आहे. एकदा सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना पराभूत केले. नंतर त्यांचे चुलतभाऊ अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना पराभूत केले. पुढे सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांना पराभूत केले. आता परत एकदा ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना फायनल आहे. आता कोण कुणाचा वचपा काढणार, हे पहावे लागेल. मधल्या काळात ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रस्त्यावरसामना झडला होता. पाटील यांच्यामागे डॉ. डी. वाय पाटील साखर कारखान्याची, तर महाडिक यांच्यामागे छत्रपती राजाराम साखर कारखान्याची ताकद आहे.

करवीरला यंदाच्या निवडणुकीला भावनेची किनार आहे. पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाले. तेथून आता त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना कॉग्रेसने निवडणुकीत उतरवायचे ठरविले आहे. त्यांच्या विरोधात सडोलीकर पाटील घराण्याचे परंपरागत राजकीय विरोधक चंद्रदीप नरके मैदानात असतील. ही लढत फायनल आहे. तेथे जुन्या पन्हाळा-बावडा मतदार संघातील संपर्काच्या जोरावर जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जनसुराज्य शक्ती हा महायुतीचा घटक आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत जनसुराज्य पक्ष किती ताणून धरणार, त्यावर त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. पाटील यांच्यामागे भोगावती साखर कारखान्याची, तर नरके यांच्यामागे कुंभी कासारी साखर कारखान्याची सत्ता आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील- सरुडकर यांच्यातील लढत फायनल मानली जात आहे. तेथे इच्छुक अनेक जण असले, तरी बऱ्यापैकी एकमत करण्याबाबत सर्व जण परस्परांशी बोलत आहेत.

इचलकरंजीत आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीतून आवाडे विरुद्ध हाळवणकर असा उमेदवारीसाठी संघर्ष होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यासपीठावर हाळवणकर यांनी स्वतः आवाडे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश घडवून आणल्यामुळे राहुल आवाडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या नावावर महाविकास आघाडीतील इच्छुक एकमत करण्याच्या विचारात आहेत.

तसे झाले तर तेथे लढत जबरदस्त होणार आहे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस व भाजपची उमेदवारी कोणाच्या तरी गळ्यात मारली जात होती. तेथे आता उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. भाजप, ठाकरे व शिंदे शिवसेनेत उमेदवारीसाठी संघर्ष आहे, तसाच संघर्ष भाजपमध्येही आहे. तर शरद पवार राष्ट्रवादीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासाठी ही जागा हवी आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपकडून खासदार महाडिक गटानेही या जागेसाठी दावा केला आहे. काँग्रेस व ठाकरे शिवसेनेत जागा वाटपावेळी खडाजंगी झाली आहे.चंदगडला उमेदवारांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच तेथे प्रचाराला सुरुवात झाली आहे.

Assembly Election 2024 : पूर्वीचे विरोधक एकत्र

या निवडणुकीत विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र दिसते आहे. भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत ४० वर्षांचे राजकीय वैर विसरून काँग्रेसचे पी. एन. पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पाटील एकत्र आले. पी. एन. यांच्या अकाली मृत्यूनंतरही ही आघाडी कायम आहे. रविवारी झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याच्या जाहिरातीवर पहिल्यांदाच दिवंगत पी. एन. पाटील यांचे छायाचित्र झळकले, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article