महिलेच्या पर्समधील अडीच लाख रुपये किमतीच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला
Published on
:
27 Nov 2024, 12:37 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:37 am
कोल्हापूर : ठाणे ते बेळगाव जाणार्या एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधील अडीच लाख रुपये किमतीच्या आठ तोळे दागिन्यांवर एस.टी.चालकाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुधीर लक्ष्मण शिंदे (वय 42, रा. समर्थगाव, पोस्ट अतित, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. शाहूपुरी पोलिसांनी चालकाला मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी पहाटे हा प्रकार घडला. राजश्री आनंदा नलवडे (40, रा. ठाणे, मूळ गाव राशिंग, ता. हुक्किरे, जि. बेळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित चालक शिंदे हा ठाणे आगार येथील असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले. चोरलेल्या दागिन्यांपैकी सोन्याची कर्णफुले चालकाकडून हस्तगत करण्यात आली आहेत. एस.टी.चालकाच्या कृत्यावर प्रवासीवर्गासह महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांतून संताप व्यक्त होत आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याचा बनाव
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, रविवारी रात्री ठाण्यातून बेळगावकडे जाणारी महामंडळाची एस.टी. बस सोमवारी पहाटे कोल्हापूर बसस्थानकात पोहोचली. यावेळी चालकाने बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगितले. किरकोळ मेंटेनन्स असल्याने प्रवाशांना काही काळ बसमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर चालक बस वर्कशॉपकडे घेऊन गेला.
काही वेळाने बस पुन्हा प्लॅटफॉर्मवर आली. अन्य प्रवाशांसह संबंधित महिला प्रवासी बसमध्ये बसल्या. महिलेने सीटवर बसताच पर्स तपासली. पर्समध्ये दागिन्यांची डबी आढळली नाही. शोधाशोधनंतर डबी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. महिलेने बस थांबविली. पोलिसही तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अन्य प्रवाशांकडे विचारणा केली. मात्र, हाती काहीही लागले नाही. संबंधित महिलेने सोन्याचा हार, कुड्या, सोन्याचा वेल, कानातील दागिने अशी आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस निरीक्षक सिंदकर, सहायक उपनिरीक्षक संदीप जाधव, गुन्हे शोध पथकातील मिलिंद बांगर, विकास चौगुले, सुशांत गायकवाड आदींनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एस.टी. वर्कशॉपमधील कर्मचार्यांकडेही चौकशी केली. नोंदीही तपासल्या. या सार्या चौकशीत बस वर्कशॉपकडे गेली नसल्याचे; किंबहुना बस दुरुस्तीचे काहीही काम करण्यात आले नसल्याचे दिसून आले.
पोलिसी खाक्यानंतर थेट कबुली
पोलिसांनी चालक सुधीर शिंदेकडे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लावला. मात्र, तो दिशाभूल करू लागला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पर्समधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन अटक केली. या प्रकारामुळे प्रवाशांचा बराचकाळ खोळंबा झाल्याने संतप्त पडसाद उमटू लागले होते.