Published on
:
21 Jan 2025, 12:35 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:35 am
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवला. पहिल्याच वर्ल्डकपवर आपल नाव कोरले. यात अश्विनी शिंदे हिचा मोलाचा वाटा आहे. तिने खो-खोचे प्रशिक्षण घेत असलेल्या धाराशिव आणि मूळगाव खंडोबाचीवाडी (ता. मोहोळ) चे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत अश्विनी शिंदे हिने चमकदार कामगिरी केल्याने खो-खोच्या पंढरीत फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
खंडोबाचीवाडी हे गाव खो-खो ची पंढरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अश्विनी शिंदे हिच्यासह कर्णधार व संपूर्ण संघातील महिलांनी शानदार कामगिरी करत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. आपल्या मुलीनं शिक्षणाबरोबरच खेळात करिअर करावे, अशी इच्छा अश्विनीचे वडील अप्पासाहेब आणि आई अनुराधा यांची होती. आमचे गुरू डॉ. चंद्रजित व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव हे मैदानावरील सर्वच मुलींना स्वतःच्या मुली मानतात. ते आमची आई-वडीलासारखी काळजी घेतात. त्यामुळेच आमच्या कामगिरीचे श्रेय त्यांनाच जाते, असे अश्विनीने सांगितले.
घरात खेळाचे वातावरण. वडील कुस्तीपटू. भाऊ जयकुमार राज्य खेळाडू, मोठी बहीण किरण हिने तीन खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला. तिसरीत असताना खो खोचा श्रीगणेशा केला. वडिलांनी उस्मानाबादच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये सहावीत प्रवेश घेतला. याअगोदर माझी मोठी बहीण किरण आमच्याच गावच्या जान्हवी व ऐश्वर्या पेठे या तेथेच शिकत होत्या. धाराशिवमध्ये छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ येथे दररोज सकाळी व संध्याकाळी सराव चालतो. तेथे डॉ. चंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बागल, अभिजीत पाटील, प्रभाकर काळे, विवेक कापसे यांनी सराव करुन घेतला.
जानकी पुरस्कार अविस्मरणीय
महाराष्ट्र संघातून खेळताना मी 14 राष्ट्रीय स्पर्धेतून 13 सुवर्ण व एक रौप्यची कमाई केली. त्यात तीन वेळा खेलो इंडिया स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील जानकी व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचीही मानकरी ठरले आहे. पहिल्याच वर्षी 14 वर्षाखालील गटाची पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण आणि भुवनेश्वरला दुसरी राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण मिळाले. माझ्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू संघात होते. परंतु उपांत्य व अंतिम सामन्यात माझी सर्वात चांगली कामगिरी झाली. त्यामुळे मला जानकी पुरस्कार मिळाला. तोच माझा अविस्मरणीय व आनंदाचा क्षण असल्याचेही अश्विनी शिंदे हिने सांगितले.