Published on
:
17 Nov 2024, 11:41 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:41 pm
डॉ. चंद्रकांत लहरीया, वैद्यकीय तज्ज्ञ
आधुनिक काळात मुलांच्या आरोग्यासमोरच्या आव्हानांत वाढ होत आहे. त्यातही लठ्ठपणा वाढत असून मानसिक आरोग्यावरही टांगती तलवार आहे. कुपोषणाची समस्या असताना गरजेपेक्षा अधिक पोषणही पोषणासंदर्भातील समस्यांना जन्म घालत आहेत.जीवनशैली बिघडली आहे आणि चालण्याची, बसण्याची शैलीही बदलली आहे. मुलांचा विचार होतो, तेव्हा त्यांची खेळण्याची जागा कमी झालेली दिसून येते.
भारतात आरोग्यसेवेच्या आघाडीवर गेल्या सात दशकांत बरीच प्रगती झाली आहे. बाल विकासाबरोबरच मुलांच्या आरोग्यातही बरीच सुधारणा झालेली दिसते. एवढे काम होऊनही सर्वंकषरीत्या दोन आव्हाने अजूनही आपल्यासमोर दिसतात. आजही बाल मृत्युदरावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आघाडीवर बर्यापैकी यश मिळाले असले तरी त्याची व्यापकता पाहिल्यास शिशू आणि मुलांचे जीवन जोपासणे कठीण काम आहे. विशेष म्हणजे 28 दिवसांपेक्षा कमी वयोगटातील बाळांना सुरक्षित जीवन प्रदान करणे अत्यावश्यक आहे. त्यांचा विविध आजारांपासून बचाव करणे, कुपोषणापासून वाचविणे यांसारखे काम करावे लागते आणि यादृष्टीने भारत सरकार चांगल्यारीतीने काम करत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. दुसरे मोठे आव्हान मुलांचे आरोग्य आणि स्थितीतील असमानता. केरळमध्ये मुलांचा मृत्युदर पाहिला तर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत पाचपट अधिक वाईट स्थिती आहे. साहजिकच काही राज्यांत या आघाडीवर वेगाने काम करावे लागेल.
बहुतांश वेळ मुले मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसलेले असतात. अशावेळी मुलांच्या मानसिक आरोग्याची स्थितीही बिकट होत आहे. त्यांच्या अंगी आक्रमकता आणि नैराश्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. कुटुंबात तणाव वाढत असेल तर मुलांवरही त्याचा परिणाम होतोच आणि होताना दिसत आहे. शेवटी आजच्या काळात मुलांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मोठा धोका तर मोबाईल किंवा स्क्रीनवर अधिक वेळ घालविण्याचा आहे. मुलांचा स्क्रीन टाईम खूपच वाढला आहे. तो कोणत्याही स्थितीत कमी करावा लागेल. यासाठी पालकांना जागरुक राहावे लागेल आणि तसे प्रशिक्षण द्यावे लागेल. शाळांनाही मुलांना स्क्रीन टाईममधून बाहेर काढण्याबाबत आणि त्यांच्या मन:स्थितीबाबत प्रामाणिकपणे विचार करावा लागेल. संपूर्ण बालविकास ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुलांना समजून घेणे आणि त्यांना पुरेसा हक्क देण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षात मुलांना जादा अधिकार मिळायला हवेत. नागरिकांना ज्याप्रमाणे राज्यघटनेने मूलभूत हक्क दिले आहेत, तसेच हक्क मुलांनाही असायला हवेत. समानता आणि शिक्षणाचा अधिकार हा त्यांचा मूलभूत आहे. कोणत्याही प्रकारच्या शोषणापासून बचाव, सकस आहार, आधार, आरोग्य आणि देखभाल यासंदर्भातील अधिकार मिळायला हवा. त्यांना चांगले वातावरण आणि पर्यावरणपूरक हवा मिळणे हेही पायाभूत व्यवस्थेचाच भाग आहे. या गोष्टी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी गरजेच्या आहेत. मुलांच्या प्रारंभीच्या हजार दिवसांत त्यांच्या मानसिक विकासावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. या बळावरच त्यांचे आयुष्य उभे राहते. मुलांचा 80 टक्के मानसिक विकास सुरुवातीच्या दोन वर्षांपर्यंत होतो. गर्भधारणेपासून ते पुढील दोन वर्षांपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आपल्याला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बालविकासाचे कार्य गांभीर्याने करावे लागेल. यापूर्वी आपण केवळ मुलांचे आयुष्य वाचविण्यासाठी काम केले आहे; पण आता त्यांना निरोगी, आरोग्यदायी जीवन कसे मिळेल, यावर लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि कौशल्य विकासावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. हे काम सुरुवातीपासून आपल्याला करावे लागेल.
आता प्रश्न हा की, सध्याच्या वातावरणात असलेल्या प्रदूषणांचा मुलांच्या आरोग्यावर होणार्या विपरीत परिणामाचा. प्रदूषणामुळे अॅलर्जीची समस्या वाढत आहे. मानसिक आरोग्यावरचे धोके वाढले आहेत. त्यात अगोदरच असलेल्या समस्या आणखीनच वाढू शकतात. प्रदूषणामुळे मुलांची सक्रियता कमी होते आणि त्यांच्या सर्वंकष विकासावर दुष्परिणामही होतो.