Published on
:
21 Jan 2025, 1:17 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:17 am
बेळगाव : देशाला स्वातंत्र मिळून 78 वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या एकमेव अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक क्षण राष्ट्रीय काँग्रेस आणि राज्य काँग्रेस यांच्याकडून श्रद्धापूर्वक साजरा केला जात आहे, असे मत महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
सुवर्ण विधानसौधसमोर उभारण्यात आलेल्या गांधीजींच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. हा क्षण ऐतिहासिक ठरावा यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष काल, आज आणि उद्याही गांधीजींचे तत्व, सिद्धांत आणि शिकवणीनुसार चालत आला आहे. तो पुढेही चालत राहणार आहे. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, साधेपणा, धार्मिक समरसता या गांधीजींच्या तत्वांनुसार काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम काँग्रेस सरकारकडून सुरू आहे. तत्वविरहित राजकारण, कष्टाशिवाय संपत्ती, आत्मशोध नसलेला आनंद, चारित्र्य नसलेले शिक्षण, नीतीविना व्यापार, मानवता नसलेले ज्ञान आणि त्यागाविना पूजा यापासून लांब राहा, असे महात्मा गांधी नेहमी सांगत. त्यांच्या मार्गावर काँग्रेसची वाटचाल सुरू आहे.
2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ काँग्रेसने 1924 मध्ये बेळगावमध्ये महात्मा गांधींजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या ठिकाणी असणार्या विहिरीतून पाणी आणून आणि प्रतिकात्मकपणे स्वच्छता करून प्रचाराची सुरुवात केली. तेथून प्रजाध्वनी यात्रेची सुरुवात करण्यात आली. राज्यभर फिरून जागृती करण्यात आली. लोकांचा पाठिंबा मागितला. लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पक्ष आणि सरकार जनतेच्या इच्छेनुसार प्रगती करत आहे. अ. भा. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने गांधीजींच्या मार्गाने प्रवास सुरू ठेवला आहे. विविध हमी योजनांच्या माध्यमातून गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खूप बदल होताना दिसत आहेत. हमी योजना देशाच्या विविध राज्यांसाठी अनुकरणीय ठरल्या आहेत. गांधीजींची तत्त्वे आणि संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, या हेतूने सुवर्ण विधानसौधसमोर गांधींचा पुतळा बसवण्यात आला आहे. वीरसौधच्या आवारात पुतळ्याचे अनावरण केले आहे. गांधीवादी तत्वज्ञानाचा संपूर्ण देशात प्रसार करण्याच्या उद्देशाने आम्ही अ. भा. काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने वर्षभर गांधी भारत कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. गांधींचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवला नाही तर ती मोठी चूक ठरेल. त्यामुळे आमचा पक्ष आणि सरकारने त्या दिशेने पाऊल टाकले आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले आहे.