Published on
:
25 Nov 2024, 9:41 am
Updated on
:
25 Nov 2024, 9:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Google Map Accident News | एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना आपण गुगल मॅपची मदत घेत असतो. मात्र गुगल मॅपवर अवलंबून राहून इच्छित स्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नात कधी-कधी मृत्यूचा देखील रस्ता मिळू शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. गुगल मॅपच्या चुकीच्या माहितीमुळे बरेलीहून बदायूं जिल्ह्यातील दातागंजला जाताना कार अपूर्ण पुलावरून रामगंगा नदीत कोसळली. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
बरेली-बदाऊन सीमेवर फरीदपूरच्या खल्लापूर गावाजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला. मैनपुरी येथील कौशल कुमार, फारुखाबादचा विवेक कुमार आणि अमित हे तिघेजण कारमधून लग्न समारंभासाठी जात होते. कार दातगंजकडून येत होती. जीपीएस सिस्टिमच्या मदतीने गाडी चालवली जात होती. मात्र मॅपमध्ये अपुर्ण पुलावरून रस्ता दाखवल्याने भरधाव कार नदीत पडली. याबाबत मंडळ अधिकारी आशुतोष शिवम यांनी सांगितले की, पुरामुळे पुलाचा पुढील भाग नदीत पडला होता, मात्र हा बदल यंत्रणेत अद्ययावत करण्यात आलेला नाही. चालक नेव्हिगेशन सिस्टम वापरत होता आणि पुल असुरक्षित असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही, ज्यामुळे कार खराब झालेल्या भागावरून खाली पडली. खराब झालेल्या पुलाच्या मार्गावर कोणतेही सुरक्षा अडथळे किंवा सुचना फलक नव्हते, त्यामुळे हा अपघात झाला. माहिती मिळताच फरीदपूर, बरेली आणि दातागंज पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नदीतून कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.