गुरु पादेश्वर महाराज वाहनावरील हल्ला प्रकरण:दोघांना अटक, मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी हल्ला केल्याची कबुली
3 hours ago
2
वसमत विधानसभा मतदार संघात मतदारासंघाच्या निवडणुकीत उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या नांदेडच्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १९ पहाटे अटक केली आहे. गुरु पादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी हल्ला करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. वसमत विधानसभा मतदार संघात गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे निवडणुक रिंगणात होते. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी ता. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला केला होता. यामध्ये ते जखमी झाले होते. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, कपील आगलावे, जमादार प्रेमदास चव्हाण, गजानन पोकळे, कुमार मगरे, राजू ठाकूर, लिंबाजी वाहुळे, आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, विशाल खंडागळे, किशोर सावंत यांच्यासह पोलिसांच्या पथकाने मागील दोन दिवसांत आरोपीचा शोध सुरु केला होता. दरम्यान, या प्रकरणातील दोघे जण वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच यापथकाने आज पहाटे भुजंग निरदोडे, संकेत भोसले (रा. मालेगाव रोड, नांदेड) यांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता नांदेड येथील एका व्यक्तीने हल्ला करण्याचे सांगितले असून गुरु पादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळावी या उद्देशाने हल्ला केल्याचे चौकशीत सांगितले. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरु आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)