संभाजी मुंडे, Tv9 प्रतिनिधी, बीड : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच जामीनावर वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. “वाल्मिक कराड 14 तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आम्ही त्याच दिवशी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाराचे उत्तर मागवले होते. आता याची सुनावणी उद्या होणार आहे. काल प्रकृती खराब असल्यामुळे मी न्यायालयात हजर राहू शकलो नाही. त्यामुळे उद्या सुनावणी होणार आहे. या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही, असं पक्षकाराचे म्हणणं आहे. या खंडणीच्या गुन्ह्यात आपल्याला गोवले गेले असेही ते म्हणाले आहेत”, अशी प्रतिक्रिया वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी दिली.
“संबंधित प्रकरण दाखल करायला झालेला उशीर हे दर्शवितं की, त्यांना या प्रकरणात गुंतवले गेले आहे. खंडणी मागितली आणि खंडणी दिली, खंडणी मागितली किंवा दिली यातील कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. आमची बाजू बघून न्यायालयाने आम्हाला जामीन द्यावा ही मागणी आम्ही उद्या न्यायालयात करणार आहोत. आमच्या पक्षकाराचा न्यायालयावर विश्वास आहे”, असं वकील अशोक कवडे म्हणाले.
वाल्मिक कराडचे अमेरिकेशी संबंध आहेत का नाही?
“वाल्मिक कराड यांच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतर पक्षकाराने संबंधित तपास अधिकारी यांच्याकडे यादी दिली आहे. यात त्यांच्यावर 14 गुन्हे दाखल होते. यापैकी 11 ते 12 गुन्ह्यातून ते दोष मुक्त झाले आहेत. बाकीचे गुन्हे राजकीय आंदोलनातील संदर्भातले आहेत. कराड यांचे अमेरिकेशी संबंध आहेत का नाही? याबाबत न्यायालयासमोर कुठलाही भाग आलेला नाही. तपास अधिकारी योग्य ते खुलासा करू शकतील”, असंही वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे म्हणाले.
दरम्यान, बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीचा तपास सुरु आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहेत. तसेच न्यायालयीन समितीची देखील स्थापना केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण, खंडणी प्रकरण आणि या प्रकरणांशी संबंधित विविध प्रकरणावर सध्या तपास सुरु आहे. तपासातून काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.