कालावल खाडीपात्रातील तोंडवळी येथे होणाऱ्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात 15 जानेवारी पासून ग्रामस्थांनी खाडीपात्रात नौकेत बसून छेडलेले साखळी उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणीही उपोषण स्थळी भेट दिलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
अवैध वाळू उपशावर कारवाई होत नसल्यामुळे तोंडवळी ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेत मागील दोन दिवसांपासून खाडीपात्रात नौकेत बसून उपोषण सुरू केल आहे. परंतु ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळी आलेला नाही. एकीकडे ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे अवैध वाळू उपसा सुरू आहे. आंदोलन सुरू होऊन चार दिवस झाले, तरीही प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांची परीक्षा पाहत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
साखळी उपोषण छेडल्यावर प्रशासनाने खाडीपात्रातील सीमांकन होईपर्यंत वाळू उपसा करू नये, अशी नोटीस वाळू व्यवसायिकांना बजावली होती. तरी देखील वाळू उपसा सुरुच आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच यावर प्रशासनाचे लक्ष का नाही? यावर प्रशासन कारवाई का करत नाही? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच ग्रामस्थांनी वाळू उपसा करणारी नौका पकडली, परंतु त्यावर कोणती कारवाई प्रशासनाने केली? याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. जोपर्यंत मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे उपोषण स्थळी येऊन आमच्याशी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही पकडलेली नौका परत देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.