अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अनेक अमेरिकन नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणाची इच्छा आहे. ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवण करायचं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे डिनरचं रेट कार्ड जारी करण्यात आलं आहे. मात्र हे रेट कार्ड अत्यंत महागडं असून, अनेकांच्या आवाक्या बाहेरचं आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स हे आपल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी निधी संकलनासाठी आयोजित केलेल्या खास डिनर पार्टीत सहभागी होणार आहेत.ज्या लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणाची इच्छा आहे त्यांना एका प्लेटसाठी तब्बल 1 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात तब्बल 8 कोटी 65 लाख 76 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
द गार्जियनच्या एका रिपोर्टनुसार निधी संकलनासाठी या जेवणाचं खास आयोजन करण्यात आलं आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या डिनर पॉलिटिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणाच्या तिकिटांची विभागणी पाच स्थरांमध्ये करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1 मिलियन अमेरिकी डॉलर भारतीय चलनामध्ये 8 कोटी 65 लाख 76 हजार 500 रुपये, त्यानंतर 500,000 अमेरिकन डॉलर, 100,000 अमेरिकन डॉलर आणि 50,000 अमेरिकन डॉलर असे पाच प्रकार आहे. म्हणजेच ज्यांना ट्रम्प यांच्यासोबत जेवणाची इच्छा आहे, त्यांना एका प्लेटसाठी लाखो रुपये मोजावे लागणार आहेत.
200 मिलियन डॉलर निधी जमवण्याचं उद्दिष्ट
समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांनी 1 मिलियन अमेरिकी डॉलर इतका निधी दिला. त्या देणगीदारांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासोबत जेवणासाठी दोन तिकिट आणि कँडललाइट डिनरसाठी सहा तिकिटं मिळणार आहेत. जरी हे जेवण महाग वाटत असलं तरी देखील अनेक देणगीदार स्वत:हून पुढे आल्याचं देखील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.या माध्यमातून एकूण 200 मिलियन डॉलर निधी जमा करण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 170 मिलियनचा निधी जमा झाला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या डिनर पॉलिटिक्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्यांच्यासोबत जेवणाची इच्छा व्यक्त केली असून, देणगीचा ओघ सुरू आहे.