Published on
:
19 Jan 2025, 5:57 pm
Updated on
:
19 Jan 2025, 5:57 pm
एखाद्या कर्मचार्याने किती काम केले पाहिजे याचे काही निकष असतात. अर्थात, सरकारी कर्मचार्यांना हे निकष लागू होत नाहीत. कारण त्यांचे कामाचे तास कोणीही मोजत नाही. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली तरी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबलेला सरकारी कर्मचारी या आठ तासांमध्ये नेमके किती तास काम करतो हे गूढ अद्याप पर्यंत कोणालाही उलगडलेले नाही. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण त्यामुळेच अस्तित्वात आली असेल.
खासगी कंपनीतील कर्मचार्यांनी किती तास काम करावे याविषयी काही एक वाद सध्या देशात सुरू आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी आठवड्याला 70 तास काम करावे असे म्हटले. त्याच्यापुढे जाऊन सुब्रमण्यम नावाच्या एका मोठ्या उद्योगपतीने 90 तास काम केले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांनी तर रविवारीसुद्धा काम केले पाहिजे, असे म्हटले आहे. आपण 90 तासांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करूया.
सात दिवसांमध्ये सुट्टी न घेता काम केले तर दररोज साधारणत: साडेबारा तास काम करावे लागेल. यामध्ये शहरांमध्ये वाहतुकीचा उडालेला बोजवारा पाहता किमान दोन तास कार्यालयात किंवा कंपनीत येण्या-जाण्यासाठी लागतील. याचा अर्थ अंदाजे 15 तास हा कर्मचारी कंपनीच्या कामासाठी एक तर प्रवास करत असेल किंवा प्रत्यक्ष काम करत असेल. आता त्याच्याकडे दिवसाकाठी म्हणजेच दररोज अवघे नऊ तास उरले आहेत. या नऊ तासांपैकी किमान आठ तास झोप काढली तर त्याने उरलेल्या एक तासामध्ये संसारोपयोगी कामे करावी तरी कशी आणि कोणत्या वेळेत? हा एक मोठाच प्रश्न उभा राहतो.
घर म्हटल्यानंतर काय एक नसते? मुलेबाळे असतात, पत्नी असते, कुणाकडे आई-वडील असतात तर कुणाकडे सासू-सासरे असतात. या एक तासामध्ये या व्यक्तीने या सगळ्या लोकांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न उभा राहतो. ज्या देशामध्ये काहीही काम न करता लोक वर्षानुवर्षे एसटी स्टँडजवळच्या हॉटेलमध्ये बसून दिवस काढतात त्या देशातील लोकांना रोजचे 15तास काम करावयास सांगणे म्हणजे अजब प्रकार आहे.
नुकताच वर्क फ्राॅम होम नावाचा प्रकार बर्यापैकी किमान संगणक क्षेत्रामध्ये रुळलेला आहे. या प्रकारामध्ये अभियंते मंडळी घरीच बसून किमान 11 ते 12 तास काम करत असतात. कार्यालयात जाण्या-येण्याचा वेळ टळतो एवढे लक्षात घेतले तरी बारा, बारा तास काम करणे हे तसे कठीणच आहे. सध्या परिस्थितीत बहुतांश कंपन्यांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नेमलेले असतात. ते दर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यानंतर तीन तास कंपनीत येऊन बसतात आणि ज्या कुणा कर्मचार्याला आपल्याला काही मानसिक आजार झाला आहे अशी शंका आहे ते येऊन खुल्या दिल्याने या तज्ज्ञांकडे आपल्या तक्रारी मांडू शकतात. आताच ही परिस्थिती निर्माण झालेली असेल तर 70 तास किंवा 80 तास किंवा 90 तास काम केल्यानंतर प्रत्येक पाच कर्मचार्यांच्या मागे एक मानसोपचार तज्ज्ञ नेमावा लागेल आणि त्याचा खर्चही कंपनीला करावा लागेल. अतिरिक्त कामामुळे चिडचिड झालेले कर्मचारी जेव्हा घरी जातील तेव्हा घरच्यांवरती काय अनावस्था प्रसंग ओढवेल याचा पण विचार करायला पाहिजे.