Published on
:
19 Jan 2025, 3:52 pm
Updated on
:
19 Jan 2025, 3:52 pm
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली - शिरोडा मार्गावर आरवली वैद्यकीय संशोधन केंद्र नजीक शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
यावेळी सिंधुदुर्ग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ऑनड्युटी असतानाही व ग्रामस्थांनी त्वरित जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्ह्यासह तालुक्यातून कौतुक होत आहे. हा अपघात सकाळच्या सुमारास घडला. यामध्ये आरवली येथील एक दुचाकीस्वार ( वय ६४) व शिरोडा येथील दुचाकीचालक ( वय २०) दोघेही जखमी झाले. यावेळी येथील स्थानिक ग्रामस्थ तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस विठ्ठल धुरी, एम.बी.सुर्वे , सोन्सूरे - आरवली पोलीस पाटील , स्थानिकांनी त्वरित सहकार्य करीत जखमींना उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस विठ्ठल धुरी , एम.बी.सुर्वे आदींनी मुख्य मार्गावरील बराच वेळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केलीच , तसेच जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले.