सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी हल्लेखोरांना ठाण्यात अटक. वरळीत नाश्ता करून जीपेने पेमेंट केलं आणि जाळ्यात आला. सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद. चार दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नाकी नऊ आणणारा मोहम्मद शेहजाद ठाण्याच्या कासारवडावली भागातील सापडला.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर चक्क बांगलादेशी निघाला आहे. ठाण्यातून मध्यरात्री दोन वाजता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर तो वरळीत नाश्त्यासाठी आला आणि तिथं Google Pay ने त्याने पेमेंट केलं. तिथूनच पोलिसांना सुगावा लागलेला आहे. गुरूवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूने हल्ला करून शेहजाद नाश्ता करण्यासाठी वरळीतल्या स्किल वर्क या कॅफेत आला. तिथे त्याने नाश्ता केला आणि Google Pay ने ऑनलाइन पेमेंट केलं. सैफवर हल्ला केल्यानंतर तो वांद्रे स्टेशनपासून दादर ते वरळीत ठिकठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे पोलिस या कॅफेत आले आणि Google पेमेंटच्या माध्यमातून मोबाईल नंबर शोधला आणि तेथे ठाणे गाठवलं. विशेष म्हणजे ज्या स्किलवर्क कॅफेत शेहजादने नाश्ता केला तिथे तो आधी कामाला होता आणि चोरीच्या आरोपानंतर त्याला कामावरून काढून टाकलं होतं. दरम्यान, मोबाईल नंबर मिळाल्यानंतर पोलिसांचं काम सोपं झालं. मोबाईल लोकेशन ट्रेस करत तो ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये असल्याचं समजलं. ठाण्यातही तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमार्फत हॉटेलमध्ये काम करायचा. जवळपास 200 जणांच्या फौजफाट्यासह पोलीस लेबर कॅम्पमध्ये आले. पोलिसांनी इथल्या सर्व लेबर कॅम्पमधील रूमची झाडाझडती घेतली. त्यावेळी शेहजादाचा मोबाईल एका रूममध्ये सापडला. मात्र तो लेबर कॅम्पच्या मागच्या बाजूला झाडाझुडुपात लपून बसला होता. त्यानंतर पोलिसांनी झाडाझुडुपांमध्ये शोधमोहीम सुरू केली. आरोपी शेहजादने ओळखू येऊ नये म्हणून अंगावर गवताचं पांगरून घेतलं पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागलाच.
Published on: Jan 19, 2025 10:54 PM