सैयद हैदर रझा यांच्या चित्रप्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन:पं. मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदर्शन सुरू; 14 फेब्रुवारीपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले

3 hours ago 1
पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे ज्येष्ठ चित्रकार सैयद हैदर रझा यांच्या चित्रांच्या प्रिंट्सचे विशेष प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रसिद्ध गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रझा फाऊंडेशनच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेले हे प्रदर्शन १४ फेब्रुवारीपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. भोपाळचे ज्येष्ठ चित्रकार आणि रझा फाऊंडेशनचे अखिलेश यांनी रझा यांच्या कलेविषयी महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली. त्यांच्या मते, रझा यांची चित्रे रंगांमधून रंगातीत होण्याची किमया साधतात. रझा यांच्या चित्रांमध्ये रंगांचा विलक्षण निर्भयतेने वापर केलेला दिसतो. त्यांच्या चित्रांतील रंग परस्परांशी संवाद साधतात आणि रसिकांना बांधून ठेवणारी रंगांची सुसंवादिता निर्माण करतात. उद्घाटन प्रसंगी पं. मुकुल शिवपुत्र यांनी चित्रकला आणि संगीत यांच्यातील नाते स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, संगीतासाठी जसा कान तयार व्हावा लागतो, तसेच चित्रकलेसाठी दृष्टी विकसित आणि समृद्ध असणे आवश्यक आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ कथक नृत्यांगना विदुषी गुरु शमा भाटे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, प्रमोद काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रझा यांच्या चित्रांमध्ये रंगांचे पारंपरिक संकेत वेगळ्या अर्थाने व्यक्त होतात. उदाहरणार्थ, थंड मानला जाणारा निळा रंग त्यांच्या चित्रात जळण्याचा, पेटण्याचा अर्थ व्यक्त करतो. त्यांची चित्रे निसर्गचित्रांपासून अमूर्त चित्रांपर्यंतचा प्रवास दर्शवतात. भौमितिक आकार, तंत्रविद्येतील यंत्रे, आकृत्या आणि बिंदूंची विविध रूपे त्यांनी प्रामुख्याने अक्रेलिक माध्यमातून साकारली आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article