Published on
:
19 Jan 2025, 3:48 pm
Updated on
:
19 Jan 2025, 3:48 pm
नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर रविवारी भारतीय महिला संघाने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. अंतिम सामन्यात नेपाळवर 78-40 असा 38 गुणांनी लिलया विजय मिळवत यजमान भारतीय संघाने विश्वचषकावर कब्जा केला. जलद चपळाई, अचूकता आणि जिद्दीने मैदानावर भारतीय महिला संघाने एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी 50 सेकंदात, दुसरी तुकडी 1.48 मि. तर तिसरी तुकडी 1.20 मि. बाद केली व चौथी तुकडी 1 मि. पाचवी तुकडी 45 सेकंदांत तर उरलेले दोन खेळाडू 34 सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी 34 गुण मिळवले. यावेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.
दुसर्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी 1.39 मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले. तर तिसरी तुकडी 53 सेकंदांच्या आत तंबूत परतल्याने खरेतर भारताला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नेपाळने आपल्या आक्रमणाची धार वाढवून 1.13 मि. चौथ्या तुकडीला बाद केले, तर त्यानंतर पुढची तुकडी नाबाद खेळल्याने भारताने मध्यंतराला 35-24 अशी 11 गुणांची आघाडी घेतली होती.
तिसर्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी 1.42 मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी 33 सेकंदांत बाद झाली. तिसर्या तुकडीला 1.07 मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरू केली. चौथी तुकडी 50 सेकंदांत कापून काढली. पाचवी तुकडी 55 सेकंदांत बाद करून नेपाळला जोरदार झटका दिला. तर सहावी तुकडी 34 सेकंदांत बाद करून नेपाळला आणखी एक झटका दिला. सातव्या तुकडीतील एक खेळाडू बाद करण्यात भारताला यश मिळाल्याने भारताने 73-24 अशी गुणांची नोंद केली. यावेळी नेपाळच्या दीप बी. के. ने चांगला खेळ केला.
चौथ्या टर्नमध्ये नेपाळने आक्रमण केले, पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने 5.14 मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमया साधली व हा सामना भारताने 78-40 असा 38 गुणांनी जिंकला.