डोनाल्ड ट्रम्प उद्या 20 जानेवारीला अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या भव्य कार्यक्रमात राजकारणी, उद्योगपतींसह विविध क्षेत्रातील ख्यातनाम दिग्गजांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे शपथविधीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्रीच्या जेवणाच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील दिग्गजांना निमंत्रण दिलं आहे. या कार्यक्रमात भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी या देखील सहभागी झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर अंबानी दाम्पत्य आता कार्यक्रमासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाली असून ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या खास आमंत्रित पाहुण्यांपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी 100 विशेष पाहुण्यांचा समावेश आहे. अशा 100 पाहुण्यांमध्ये अंबानी दाम्पत्य देखील आहे. अंबानी कुटुंबीय आणि ट्रम्प कुटुंबीय यांच्यात अनेक काळापासून घनिष्ठ संबंध आहेत. इवांका ट्रम्प 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा मुकेश अंबानी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले तेव्हादेखील मुकेश अंबानी त्यांच्यासोबत होते.
शपथविधीच्या कार्यक्रमात असणार दिग्गजांची मांदियाळी
डोनाल्ड ट्रम्प उद्या दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जगभरातील दिग्गज उपस्थित असतील. यामध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच टेक्नोलॉजी आणि उद्योग क्षेत्रातील एलन मस्क, जेफ बेजोस, टिम कुक, मार्क जुकरबर्ग, सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमॅन हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या केवळ दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार नाही तर त्यांचा जगात असलेला प्रभाव आणि नेटवर्कही दिसून येणार आहे. या कार्यक्रमातून राजकारण, तंत्रणात आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच मंचावर एकत्र येताना दिसणार आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा कार्यक्रम आगामी वाटचालींसाठी जास्त महत्त्वाचा ठरणार आहे.