Published on
:
19 Jan 2025, 12:57 pm
Updated on
:
19 Jan 2025, 12:57 pm
अमरावती : जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात मांडवा शेत शिवारात गट क्र. ६७ मध्ये विजय दयाराम माहुलकर यांच्या शेतात ९ महिन्याचे बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळले. ही घटना शनिवारी (ता.१८) उघडकीस आली.
सदर शेतमालकाने दुपारी २ वाजता चांदुर रेल्वे वनविभागाला कळविल्या नंतर वन विभागाने रेस्क्यू करून प्रथमोपचार केले आणि नंतर त्याला परतवाडा येथे नेण्यात आले. विजय माहुलकर शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता पराटीच्या शेतामध्ये नऊ महिन्याचे बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती वन विभागाला फोनवरून दिली. चांदुर रेल्वेचे वन विभागीय अधिकारी भानुदास पवार व अमरावती येथील वन विभागाची रेस्क्यू टीम त्वरित घटनास्थळी पोहचली. जखमी बिबटच्या पिल्ल्याला दोरीच्या साह्याने पकडून वन विभागाच्या पिंजर्यात टाकण्यात आले व त्याला प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरीता परतवाडा येथील ट्रीटमेंट सेंटर येथे हलविण्यात आले.
या कार्यवाही मध्ये वन विभागीय अधिकारी भानुदास पवार, चांदुर रेल्वे, वनपाल अमोल गावनेर, वनरक्षक एस एन राठोड, वनरक्षक अतुल धसकट, सुरज भांबुरकर, अक्षय चमणकर, आसिफ पठाण, सुशील तायडे, वनमजूर गणेश शनवारे, चांदूर रेल्वे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर स्थुल व भास्कर गावंडे यांनी मोलाची भूमिका बजावली.