मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात टीम इंडियासाठी प्रतिनिधित्व करणारे आजी माजी मुंबईकर खेळाडूंची उपस्थितीत आहेत. तसेच राष्ट्रवादी शप गटाचे प्रमुख आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, एमसीएचे सदस्य आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईकर रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडियमधील स्मृतींना उजाळा दिला. रोहितने या प्रकट मुलाखतीत अनेक विषयांना हात घातला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
जेव्हा पण आम्ही येथे खेळतो, मग तो सामना टीम इंडियाचा असो, मुंबईचा असो किंवा मुंबई इंडियन्सचा असो, कोणत्याही सामन्यात चाहते कधीही निराशा करत नाही. त्यामुळे इथे खेळण्याची एक वेगळीच मजा आहे”, अशा शब्दात रोहितने मुंबईकरांचं क्रिकेटवर आणि खेळाडूंवर किती प्रेम आहे, हे नमूद केलं.
आम्ही 2007 साली दक्षिण आफ्रिकेतून टी 20 वर्ल्ड कप जिंकून आलो होतो. तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत विजयोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हा त्यानंतर मलाही इथे एक वर्ल्ड कप घेऊन यायचाय, असं मी एक स्वप्न पाहिलं होतं. कुणाला माहित नव्हतं, मात्र तो वर्ल्ड कप मुंबईत यावा, वानखेडेत यावा, अशी माझी इच्छा होती. भारताने जिंकलेल्या 2007 आणि 2011 मधील वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष इथे वानखेडेत झाला आहे. त्यामुळे 2024 चा वर्ल्ड कपही इथे आणायचा होता. वानखेडे असं स्टेडियम आहे जिथे खेळणं, स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करायला मजा येते”, असं रोहितने म्हटलं.