अभिनेता अक्षय कुमार 'बिग बॉस 18'च्या सेटवर ग्रँड फिनालेच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. त्याने सेटवर तासभर प्रतीक्षा केली अन् अखेर शूटिंग न करताच तो तिथून निघून गेला. बिग बॉसच्या टीमकडून त्याला नंतर अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र त्याने शूटिंगला यायला नकार दिला.
Akshay Kumar and Salman KhanImage Credit source: Instagram
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले आज (19 जानेवारी) पार पडतोय. तब्बल 105 दिवसांनंतर या शोचा विजेता जाहीर होणार आहे. प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकारांनाही या ग्रँड फिनालेची प्रचंड उत्सुकता असते. या फिनालेमध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धकसुद्धा सहभागी होतात. त्याचसोबत इतरही मोठे सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. रविवारी दुपारपासूनच ग्रँड फिनालेच्या शूटिंगची सुरुवात झाली होती. सुमारे अडीच वाजताच्या सुमारास अक्षय कुमार सेटवर आला होता. त्याच्यासोबत ‘स्काय फोर्स’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वीर पहाडियासुद्धा फिनालेमध्ये खास पाहुणा म्हणून पोहोचला होता. मात्र फिनालेचं शूटिंग न करताच अक्षय तिथून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 18’चा सूत्रसंचालक सलमान खान सेटवर उशीरा पोहोचल्याने अक्षय कुमार तिथून शूटिंग न करताच निघून गेला. अक्षय त्याच्या वेळापत्रकाबाबत खूपच सजग असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. सेटवर वेळेचं तंतोतंत पालन होण्यासाठी तो आग्रही असतो. यानुसार तो दुपारी 2.15 वाजता बिग बॉसच्या सेटवर शूटिंगसाठी पोहोचला होता. मात्र तेव्हा सलमान सेटवर उपस्थित नव्हता. अक्षयने जवळपास तासभर सलमानची प्रतीक्षा केली. मात्र तरीसुद्धा सलमान सेटवर न आल्याने तो तिथून निघाला.
हे सुद्धा वाचा
अक्षय कुमारला आगामी ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचं होतं. म्हणून तो बिग बॉसच्या सेटवर अधिक वेळ प्रतीक्षा करू शकला नाही. नंतर बिग बॉसच्या टीमकडून अक्षय कुमारला पुन्हा सेटवर बोलावण्यासाठी अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र अक्षयने शूटिंग करण्यास नकार दिला. अक्षय आणि सलमान यांनी आपापसांत चर्चा केली. त्यावेळी अक्षयने त्याला त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकाबद्दल समजावून सांगितलं. अक्षय कुमारनंतर वीर पहाडियाने बिग बॉसचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानेच टॉप 5 स्पर्धकांची नावं घोषित केली.