मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. दरम्यान नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी देखील ते आपल्या गावी गेले होते. आता देखील ते आपल्या मुळगावी गेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
शिंदे नाराज असल्याची चर्चा
पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याचं समोर येत आहे. शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेलं नाहीये. परंतु दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद देण्यात यावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपची प्रतिक्रिया
यावर आता राज्याचे माजी वनमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे नाराज असतील तर भाजपचे नेते याबाबतीत काय तो निर्णय घेतील. माझा या प्रश्न व उत्तराशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांनाही धक्का
दरम्यान पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांना देखील स्थान देण्यात आलेलं नाहीये. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देण्यात येऊ नये अशी देखील मागणी करण्यात येत होती. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना देण्यात आलं आहे. अजित पवार हे आता पुण्यासह बीडचे पालकमंत्री असणार आहेत.