Published on
:
19 Jan 2025, 10:51 am
Updated on
:
19 Jan 2025, 10:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मलेशियामध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात गतविजेत्या भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पारुनिका सिसोदियाच्या घातक गोलंदाजीमुळे विंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 13.2 षटकांत फक्त 44 धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर 4.2 षटकांत 1 विकेट गमावून टीम इंडियाने 45 धावांचे विजयी लक्ष गाठले.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी पुढे वेस्ट इंडिजचा संघ 13.2 षटकांत 44 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताला हा सामना जिंकण्यासाठी 45 धावांचे मिळाले. टीम इंडियाने फक्त 4.2 षटकांत म्हणजेच 26 चेंडूंत एका विकेटच्या मोबदल्यात 47 धावा करून सामना जिंकला. भारताकडून 2 षटकांत 5 धावा देत 2 बळी घेणाऱ्या जोशिता व्हीजेला सामनावीराचा किताब देण्यात आला.
दुसऱ्या डावात, भारताकडून गोंगाडी त्रिशा आणि जी कमलिनी सलामीला आल्या. त्रिशा 2 चेंडूत एका चौकारासह 4 धावा काढून बाद झाली. यानंतर कमलिनीने नाबाद 16 धावा तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सानिका चालकेने 11 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 18 धावा केल्या. यासह संघाला सहज विजय मिळाला. या विजयासह भारताच्या खात्यात 2 गुण जमा झाले आहेत.
पहिल्या डावात भारताची गोलंदाजी उत्कृष्ट झाली. जोशिताने 2 षटकांत 5 धावा देत 2 बळी घेतले तर आयुषी शुक्लाने 4 षटकांत 6 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय, पारुनिका सिसोदियाने 2.2 षटकांत 7 धावा देत 3 बळी घेतले आणि ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. वेस्ट इंडिजची सलामीवीर अॅस्बी कॅलेंडरने 12 धावा केल्या तर केनिका कासारने 15 धावा केल्या. संघाचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर इतर ४ फलंदाजांना 5 धावांचा टप्पाही गाठता आला नाही.