'घरोघरी मातीच्या चुली'च्या सेटवर विक्की कौशलची खास हजेरीInstagram
Published on
:
08 Feb 2025, 8:51 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशल यांच्या छावा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने विक्की यांनी घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर खास हजेरी लावली.
सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की यांनी खास टिप्स दिल्या. खेळ असो नाहीतर लढाई... हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते. आणि जगात नवरा बायको पेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या असा कानमंत्र देत विक्की यांनी जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीसोबतचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. सुरुवातीला विक्की यांच्यासोबत काम करण्याचं दडपण होतं. मात्र त्यांनी येताक्षणीच हे दडपण दूर केलं. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेंट होती, अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली.
घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहा. १४ फेब्रुवारीपासून छावा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.