राजधानी नवी दिल्लीत 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज दिल्लीत मतमोजणी पार पडली या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आम आदमी पार्टी ही पोस्टल तसेच ईव्हीएम मतमोजणीतही पिछाडीवर पाहायला मिळाले. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला 48 जागांवर विजय मिळाला. तर ‘आप’ला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता या निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिल्ली निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. “महाराष्ट्रात कुणालाही विचारलं तर ते सांगेल की हे Evm ची जादू आहे”, असे मेहबूब शेख म्हणाले.
महाराष्ट्राची पुनरावृत्तीच
“माझ्या मित्राने मला सांगितलं होतं की भाजप 42 च्या पुढे राहिलं. महाराष्ट्राच्या निवडणुका पहिल्या, मी स्वत: निवडणूक लढवली. भाजपच्या 70 पैकी 70 जागा आल्या असत्या तरी मला नवल वाटलं नसतं. हे Evm सरकार आहे. Evm हैं तो मुमकिन हैं, असा भारतीय जनता पार्टीचा नारा झाला आहे. महाराष्ट्राची पुनरावृत्तीच झाली आहे”, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी टीका केली.
विरोधी पक्ष 50 च्या आत आला आणि हे 237 वर गेले
“महाराष्ट्राचा निकाल तुम्ही बघा, लोकसभेला नरेंद्र मोदींचा चेहरा असतानाही महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. अमोल किर्तीकरांची निवडून आलेली जागा पराभूत दाखवली, शशिकांत शिंदे यांची जागा पिपाणीमुळे गेली. इचलकरंजी, बुलढाणा, पालघर आणि अकोला इथं ट्रँगल फाईट झाली. सरळ फाईट झाली असती तर 37 ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांनी यांना नाकारलं होतं. मग शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं चार महिन्यात असं काय कर्तृत्व झालं की विरोधी पक्ष 50 च्या आत आला आणि हे 237 वर गेले. महाराष्ट्रात कुणालाही विचारलं तर ते सांगेल की हे Evm ची जादू आहे”, असे मेहबूब शेख म्हणाले.
“केजरीवालसारख्या माणसाचा पराभव होतो”
“काँग्रेस आणि आप जरीसोबत लढले असते तरी Evm भाजपसोबत आहे. केजरीवालसारख्या माणसाचा पराभव होतो. एवढं चांगलं काम करणारा माणूस स्वत: पडतो. यावरून Evm च्या जोरावर आम्ही काही करू शकतो हे भाजप दाखवते”, असेही मेहबूब शेख यांनी म्हटले.