Published on
:
08 Feb 2025, 2:13 pm
Updated on
:
08 Feb 2025, 2:13 pm
शिऊर : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील व्यावसायिकांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने शुक्रवारी (दि.७) अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस बजावल्याने छोटया-मोठ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तब्बल वीस ते २५ वर्षांपासून या जागेवर पोट भरणाऱ्यांवर आता उघडयावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. यामुळे महामार्ग विभागाने आमचे अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी आता महामार्गावरील छोट्या व्यापारी वर्गातून होत आहे.
शिऊर बंगला येथे गेल्या २० ते २५ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फावर मोठया प्रमाणात फळ विक्रेत्यांसह बुक स्टॉल, चहा, टपरी, किराणा दुकान, रसवंती यासह इतर छोटया मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने धाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. यातील शेकडो व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा गाडा यावरच अवलंबून आहे. यामुळे जर आता हे अतिक्रमण हटवल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, असे झाल्यास त्यांना नव्याने पुन्हा दुकाने थाटण्यास मोठे कष्ट घ्यावे लागतील अशा भावना व्यापारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, संबंधित विभागाने आम्हाला वेठीस धरण्याण्याऐवजी हा परिसर सोडून मागे-पुढे रस्ता विस्तारीकरण करावे, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.