तालुका क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरामध्ये बोलताना न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी.pudhari photo
Published on
:
08 Feb 2025, 3:57 pm
Updated on
:
08 Feb 2025, 3:57 pm
किनवट : आजच्या या महाशिबिरामध्ये आपल्याला ज्या काही शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे, त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही स्वतः घेत आपल्या संपर्कातील इतर लोकांपर्यंतही पोहोचवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी केले.
शनिवारी (दि.08) येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरामध्ये ते बोलत होते. यावेळी न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर, मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महाशिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले की, या आयोजनामागचा उद्देश हा केवळ लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा आहे. शासन कायम चांगल्या योजना निर्माण करते. पण बहुतेक वेळा ही माहिती जनतेपर्यंत जात नसल्याचे दिसून आले. न्यायालयीन कामकाज करताना देखील अनेक बाबी नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे मदतीसाठीच राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती झाली. न्यायाबद्दल, आपल्या सोयी सुविधांबद्दल, माहिती व्हावी हा यामागील उद्देश आहे. आज इथे उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून हा उद्देश सफल होताना दिसतो आहे ,असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यांना त्याचा फायदा होत नाही एका छताखाली सर्व योजना उपलब्ध व्हाव्यात व लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा ही या आयोजना मागची भूमिका आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता ज्या यंत्रणांनी जिल्हा विधी प्राधिकरणाला मदत केली. त्यांच्याप्रती त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच सभागृहात उपस्थित बहुसंख्य महिलांची नोंद घेऊन, महिला सक्षमीकरणाकडे आपले पाऊल पडत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनीही संबोधित केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले. सर्व शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले.