Published on
:
08 Feb 2025, 4:54 pm
Updated on
:
08 Feb 2025, 4:54 pm
अमरावती : मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात भारतीय लष्करातील जवान दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थजवळ पूर्णा नदीत बुडाला. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास रामतीर्थ येथे घडली. गोपाल रामदास वानखडे (वय ३२) असे बुडालेल्या जवानाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, आज गोपाल हा त्याचे मित्र विकास नागोराव सोनोने व विकी गौतम सोनोने यांच्या सोबत काही कामानिमित्त अकोला येथे गेला होता. तेथून परत येत असताना रामतीर्थ येथील पूर्णा नदी पात्रात गोपाल चा मित्र विकास सोनोने हा पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडत होता. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी गोपाल वानखडे गेला. मात्र मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वतः पाण्यात बुडाला. विकास सोनोने यास अकोला येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकास यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे. या घटनेची माहीती तहसिलदार, येवदा पोलिस, अमरावती जिल्हा शोध आणि बचाव पथकास देण्यात आली आहे.