रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल विदर्भाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण विदर्भाला सुरुवातीला धक्का बसला. अवघ्या 44 धावांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत गेले होते. यानंतर करूण नायरने दानिश मालेवारसह मोर्चा सांभाळला. चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. तसेच विदर्भने पहिल्या दिवशी 6 गडी गमवून 264 धावा केल्या. यात करूण नायरच्या नाबाद 100 धावा आहेत. करुण नायरने 180 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 100 धावा केल्या. यावेळी त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज फेल ठरत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही हे दोन्ही दिग्गज खेळाडू काही खास करू शकले नाहीत. दुसरीकडे, करुण नायर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियाचं दार ठोठावत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची संघात निवड होईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. कदाचित इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यात कसोटी संघात स्थान मिळू शकतं. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
रणजी स्पर्धेच्या सध्याच्या पर्वातील हे तिसरं शतक आहे. त्याने 7 सामन्यातील 11 डावात 54 च्या सरासरीने 540 धावा केल्या. यात एक अर्धशतक ठोकलं असून 123 हा सर्वोत्तम स्कोअर आहे. करूण नायर विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 9 सामन्याती 8 डावात 389.50 च्या सरासरीने 779 धावा केल्या. यावेळी त्याने 5 शतकं ठोकली. करुण नायरने प्रथम श्रेणीतील 112 सामन्यातील 178 डावात जवळपास 49 च्या सरासरीने 7888 धावा केल्या आहेत. यात त्याची 328 ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याने 22 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद अली, साई सुधारसन, एन जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष रंजन पॉल, विजय शंकर, आंद्रे सिद्धार्थ सी, रविश्रीनिवासन साई किशोर (कर्णधार), एम मोहम्मद, बूपती कुमार, सोनू यादव, एस अजित राम.
विदर्भ (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, ध्रुव शोरे, दानिश मालेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (विकेटकीपर/कर्णधार), हर्ष दुबे, आदित्य ठाकरे, यश ठाकूर, अक्षय वाखारे, नचिकेत भुते