घाटपुरी येथील जगदंबा संस्थानमध्ये आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात:पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिरात मिळणार प्रवेश‎

2 hours ago 1
खामगाव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटपुरी येथील जगदंबा संस्थानमध्ये गुरुवारी ३ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. सकाळी साडे अकरा वाजता मंदिराचे विलास दळी यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापनेची वेद विद्यालयाच्या ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात मंदिराचे विश्वस्त मंडळ व भाविकांच्या उपस्थितीत घट स्थापनेची पुजा पार पडणार आहे. ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत उघडे राहणार आहे. मंदिराचा परिसर केळी व आंब्याच्या पानांनी सजविण्यात आला असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या वेगवेगळया रांगा राहणार आहेत. विहीगाव व केला हिंदी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मंदिरात नऊ दिवस सेवा देणार आहेत. दीडशे वर्षापुर्वी घाटपुरी येथील जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जगदंबा मातेची मूर्ती आढळली होती. त्यानंतर या मूर्तीची एका छोट्याशा मंदिरात स्थापना करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची देवीवरील श्रध्दा वाढत गेली. आता भव्य असे देवीचे मंदिर उभारण्यात आले असून नुकताच या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. स्वार्थ न ठेवता मंदिराचे विश्वस्त मंडळ काम करत आहेत. मंदिर परिसरात मंगल कार्यालयाची देखील उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिरात गुजरात, मुंबई, पुणे, इंदोर, नागपूर, संभाजीनगर व कोल्हापूरसह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नवरात्रीच्या काळात देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. नवरात्र उत्सवानिमित घाटपुरी येथील जगदंबा संस्थान सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात २५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच शिवाजी नगर पोलिसांच्या वतीने मंदिर परिसरात अस्थायी स्वरुपाची पोलिस चौकीही सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी चोवीस तास पोलिस कर्मचारी उत्सवा दरम्यान तैनात राहणार आहेत. मंदिर परिसरात प्रसाद, देवीचे वस्त्र, हार फुले, रेवडी फुटाने, खेळणीची दुकाने व खाद्यपदार्थांची जवळपास पन्नास दुकाने थाटण्यात आली आहेत. दरवर्षी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत यंदा मंदिर संस्थानने चोख नियोजन केले आहे, अशी माहित मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article