Published on
:
24 Nov 2024, 12:46 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:46 am
कसबा बावडा : राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या आणि शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम राहिलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे (शिवसेना शिंदे) उमेदवार चंद्रदीप नरके यांनी 1,976 मतांनी राहुल पी. एन. पाटील यांच्यावर विजय मिळवला. गत निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या चार निवडणुकांत ते तीन वेळा आमदार झाले आहेत. लाडकी बहीण योजना आणि संताजी घोरपडे यांनी नरके यांच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
महायुतीकडून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर), संताजी घोरपडे (जनसुराज्य शक्ती), विष्णू गायकवाड (बहुजन समाज पार्टी), हरी कांबळे (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया - ए), दयानंद कांबळे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून अॅड. माणिक शिंदे, अॅड. कृष्णाबाई चौगले, अरविंद माने, असफी मुजावर, माधुरी जाधव निवडणूक रिंगणात होते.
महायुतीकडून शिवसेनेचे चंद्रदीप नरके व महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर) यांच्यातच खरी लढत झाली. शासकीय धान्य गोदाम रमणमळा येथे मतमोजणीला 8 वाजता सुरुवात झाली; पण टपाली मतदानाबरोबरच साडेआठ वाजता ईव्हीएम मधील मतमोजणी सुरू झाली. पन्हाळा तालुक्यातील पहिले सहा फेर्यांमध्ये चंद्रदीप नरके यांनी आघाडी घेतली ती आघाडी पन्हाळा व करवीर तालुक्यांत कमी करण्यात राहुल पाटील यांना यश आले नाही. गगनबावडा तालुक्यातील तिन्ही फेर्यांमध्ये राहुल पाटील यांनी नरके यांची आघाडी कमी करून ती 7,900 पर्यंत आणली.
दहाव्या फेरीपासून अपवाद वगळता विसाव्या फेरीपर्यंत चंद्रदीप नरके यांची आघाडी वाढत राहिली. 21 ते 26 या सलग फेर्यांमध्ये राहुल पाटील यांनी 15,873 मतांची आघाडी घेतली. टपाली आणि सैनिक मतांमध्ये राहुल पाटील यांनी सुमारे 500 मतांची आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर चंद्रदीप नरके 1,976 मतांनी विजयी झाले. शेवटच्या क्षणापर्यंत निकालाचा कल स्पष्ट होत नव्हता, 25 व्या फेरीची मते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केल्यानंतरच राहुल पी. एन. पाटील समर्थकांनी मतमोजणी केंद्र सोडले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा सिंघन, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रुपाली रेडेकर व बी. जी. गोरे यांनी काम केले.
करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,684 टपाली मतदान झाले. यापैकी 2,439 मते वैद्य ठरली, तर 245 मते अवैध ठरली. यातील 1,422 मते राहुल पाटील यांना मिळाली, तर 932 मते चंद्रदीप नरके यांना मिळाली. संताजी घोरपडे यांना 43 मते मिळाली. विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके मतमोजणी केंद्रावर आले. सोबत अजित नरके होते. मतमोजणी केंद्रावर नरके पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर नरके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघन यांच्याकडून विजयी प्रमाणपत्र स्वीकारले.