Published on
:
19 Jan 2025, 6:42 am
Updated on
:
19 Jan 2025, 6:42 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) चा कर्णधार बनणे जवळजवळ निश्चित आहे. एलएसजी व्यवस्थापनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते. नोव्हेंबर 2024 च्या लिलावात त्याला एलएसजीने 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
याआधी पंतने दिल्ली कॅपिटल्स (डीसी) चे नेतृत्वही केले आहे. त्याच्याकडे एलएसजीचे नेतृत्व सोपवले गेल्यास तो या फ्रँचायझीचा दुसरा कर्णधार ठरेल. यापूर्वी, 2022 ते 2024 पर्यंत, केएल राहुलने एलएसजीचे नेतृत्व केले. हा संघ त्यांच्या कार्किर्दीतील पहिल्या दोन वर्षांतच प्लेऑफमध्ये धडक मारण्यात यशस्वी झाला होता.
2024 च्या हंगामात, एलएसजी प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्या हंगामात संघ सातव्या स्थानावर राहिला. तर एका सामन्यादरम्यान, कर्णधार राहुल आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांचा जोरदार वाद झाला होता. त्या घटनेनंतर राहुल लिलावात गेला, जिथे त्याला दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ने खरेदी केले.
लिलावापूर्वी, एलएसजीने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बदोनी आणि मोहसिन खान या 5 खेळाडूंना कायम ठेवले होते. अशा परिस्थितीत, पूरनकडे कर्णधारपदाचा पर्याय म्हणूनही पाहिले जात होते. पण आता पंतचे नाव कर्णधार पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तो आगामी हंगामात एलएसजीला त्यांच्या पहिल्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.
पंतने यापूर्वी 2021, 2022 आणि 2024 च्या हंगामात डीसीचे नेतृत्व केले होते. दुखापतीमुळे तो 2023 मध्ये खेळू शकला नव्हता. त्याने कर्णधार पदाच्या वादामुळे डीसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला डीसीचे नेतृत्व करायचे होते, पण संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. याच कारणासाठी पंतने डीसीची साथ सोडली आणि तो लिलावात सहभागी झाला. यादरम्यान, त्याला एलएसजीने भली मोठी किमत देऊन विकत घेतले.
पंतची आयपीएल कारकीर्द कशी राहिली आहे?
पंत 2016 पासून डीसी फ्रँचायझीचा भाग होता. त्याने आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत आणि 110 डावांमध्ये 35.31 च्या सरासरीने 3,284 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके झाली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 128 आहे. आयपीएल 2022 मध्ये, डीसीने या खेळाडूला आपला कर्णधार बनवले. तथापि, कर्णधार म्हणून तो संघाला जेतेपदापर्यंत नेऊ शकला नाही.
फलंदाज : ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मॅथ्यू ब्रीट्झके, अब्दुल समद, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग आणि निकोलस पूरन.
अष्टपैलू खेळाडू : मिचेल मार्श, दिग्वेश सिंग, युवराज चौधरी, अर्शीन चौधरी, आरएस हंगरगेकर आणि आयुष बदोनी.
गोलंदाज : आवेश खान, आकाश दीप, एम सिद्धार्थ, शाहबाज अहमद, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, शमर जोसेफ, प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई.
लिलावानंतर, एलएसजी संघात एकूण 24 खेळाडू आहेत, ज्यात 18 भारतीय आणि 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.