इस्रायल-हमास युद्धबंदी करार लागू झाल्यानंतर हमासच्या अतिरेक्यांनी आनंद साजरा केला.(Image source- X)
Published on
:
19 Jan 2025, 10:20 am
Updated on
:
19 Jan 2025, 10:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगाचे लक्ष वेधलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार आज (दि. १९) सुमारे तीन तासांच्या विलंबानंतर लागू झाला, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. दरम्यान, कराराच्या अंमलबजावणीत तीन तास झालेल्या विलंबास इस्रायलने हमासला जबाबदार ठरवले आहे. इस्रायलने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:१५ वाजता युद्धबंदी करार लागू झाला. दरम्यान, हमासने ओलिसांची नावे देण्यास विलंब केलेल्या वेळेत गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
'युद्धबंदी' करारास तीन तास विलंब का?
इस्रायल आणि हमास यांच्यातील सहा आठवड्यांच्या युद्धबंदीचा पहिला टप्पा रविवारी सकाळी ८.३० वाजता लागू होणार होता. करार अंमलात येण्यापूर्वी, इस्रायलने स्पष्ट केले होते की, हमासओलिसांची नावे सुपूर्द करत नाही तोपर्यंत युद्धबंदी सुरू होणार नाही. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे नावे सादर करण्यास विलंब झाल्याचे हमासने म्हटले आहे. तीन तासांनंतर, हमासने तीन ओलिसांची नावे इस्रायलला सोपवली. त्यात तीन महिलांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला ओलीस ठेवण्यात आले.
इस्रायलचा गाझा पट्टीत हवाई हल्ला, आठ जणांचा मृत्यू
हमासकडून नावे मिळण्यास विलंब होत असताना, इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. दक्षिण गाझा शहरातील खान युनूस येथील नासेर रुग्णालयाने हल्ल्यातील मृतांची पुष्टी केली. इस्रायलने म्हटले आहे की हमासने सुटका करायच्या असलेल्या ओलिसांची नावे उघड न करून युद्धविराम सुरू होण्यास विलंब केला. युद्धबंदी सुरू झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी हमासने नावे सुपूर्द केली.
पहिल्या टप्प्यात ३३ ओलिसांची सुटका केली जाणार
या कराराअंतर्गत हमास पहिल्या टप्प्यात ३३ बंधकांना सोडेल आणि त्या बदल्यात इस्रायल ७०० पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करेल. या करारामुळे, दोन्ही पक्ष त्यांच्या सर्वात प्राणघातक आणि विनाशकारी संघर्षाच्या समाप्तीच्या दिशेने एक पाऊल जवळ येत आहेत.
युद्धबंदी करार होण्यापूर्वी नेतान्याहू यांनी दिला होता इशारा
गाझामध्ये युद्धबंदी करार होण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला होता. इस्रायलला युद्ध पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे, असे इस्रायलने म्हटले होते. हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी मिळत नाही तोपर्यंत ते करारावर पुढे जाऊ शकणार नाहीत. इस्रायल कराराचे कोणतेही उल्लंघन सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.. गरज पडल्यास, इस्रायल अमेरिकेच्या पाठिंब्याने पुन्हा युद्ध सुरू करू शकतो. आम्हाला सर्व बंधकांना आधी इस्रायलमध्ये परत आणायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.