बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आलाय. यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय. 'बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना आणि देवेंद्र फडणवीस यांना बीडचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची विनंती केली होती'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासह पुण्याच्याही पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आलाय. यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय. बीड जिल्ह्याची सध्याची स्थिती पाहून मीच अजित दादांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीडचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची विनंती केली होती. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा, ही माझी भावना आहे, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणी समर्थन करू शकत नाही. या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवा, अशी मागणीही मुंडेंनी केली. पण यामुळे बीडमध्येच नाही तर मराठवाड्यात जो सामाजिक सलोखा बिघडला आहे. बीडची बदनामी करू नका असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले. तर विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा, असे वक्तव्य करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना आवाहन केले. मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही, असा इशारा सुद्धा धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिला.
Published on: Jan 19, 2025 03:28 PM