छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी:आरोपीला बीडमधून अटक, अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

2 hours ago 1
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका इसमाकडून भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने मेसेज आणि फोनद्वारे ही धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 29 सप्टेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच आरोपीने भुजबळ यांना मेसेजवर अश्लील शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांकडून आरोपीची ओळख पटली असून रविंद्र यशवंत धनक असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ यांना धमकी आल्यानंतर नाशिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नाशिक पोलिस आरोपीचा शोध घेत होते. नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने आरोपी रविंद्र धनक याला बीड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. याआधीही आले होते धमकीचे पत्र दरम्यान, ओबीसी नेते तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना यापूर्वीही धमकीचे अनेक फोन आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात तर छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आले होते. विशेष म्हणजे त्या पत्रात भुजबळ यांच्या हत्येसाठी बैठक झाल्याचा उल्लेख होता. या बैठकीला पाच जण उपस्थित होते. ही बैठक कुठे झाली, याची माहिती देखील त्या पत्रात देण्यात आली होती. या धमकीच्या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तसेच ते पत्र पोलिसांकडे देण्यात आले होते. धमकी आली तरी मी घरी बसू शकत नाही, जे परिणाम व्हायचे ते होतील, असे भुजबळ म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article