जकातवाडी : येथे दोन गटांत जोरदार राडा झाल्याने गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. Pudhari File Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:54 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:54 am
सातारा : जकातवाडी (ता. सातारा) येथे गुरुवारी सकाळी एका जमावाने घरांवर दगडफेक करत कोयते, सळई, लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. दुसर्या गटानेही प्रतिकार करत त्याला उत्तर दिले. सुमारे 1 तास ही धुमश्चक्री सुरू असताना पोलिस आल्यानंतरही जमाव न ऐकता एकमेकांना भिडल्याने तणाव निर्माण झाला. जुना वाद व गायरान जमीन यातून हा राडा झाला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सुमारे 15 जणांची धरपकड केली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जकातवाडीमध्ये गायरान जमिनीवर राहणार्यांमध्ये व अन्य एकासोबत वाद सुरू आहे. गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा सूर एकीकडे असताना इतर कारणातूनही एकमेकांविरुद्ध तक्रारीही दाखल आहेत. त्याचे पर्यवसान गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास जोरदार धुमश्चक्रीत झाले. सुरुवातीला वाद सुरू असताना जमाव जमत होता. वातावरण तणावपूर्ण होत जाऊन एका गटाने चाल करत तुफान दगडफेक केली. कोयते, लोखंडी सळई, दांडकी काढून तोडफोड करण्यास व एकमेकांवर धावून जाण्यास सुरुवात केली.
यामुळे अवघ्या 15 मिनिटांमध्ये जकातवाडीमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली. दोन्ही जमाव एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. मारहाणीमध्ये महिलांचाही सहभाग होता. एकमेकांना लाकडी दांडक्याने व दगडांनी बडवाबडवीला सुरुवात झाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. तात्काळ तालुका पोलिसांनी धाव घेतली तेव्हा हाणामारी लाईव्ह सुरुच होती. सुरुवातीला काही पोलिस पोहचले. दगडांचा वर्षाव होवू लागल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. जमाव मोठा असल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली.
जकातवाडी गावात पोलिस आल्यानंतरही दोन्हीकडील जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. परिसरात लपून-छपून एकमेकांवर धावून जाणे, मारहाण करणे पोलिसांसमोर सुरुच होते. पोलिसांची कुमक वाढल्यानंतर पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरु होता. दुपारपर्यंत पोलिसांनी सुमारे 15 ते 18 जणांना ताब्यात घेतले. जमाव पांगल्यानंतर व संशयितांची पकडापकडी झाल्यानंतर गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत परस्पर विरोधी तसेच पोलिसांच्यावतीने एक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
व्हॉटस्अॅपवर शाब्दिक वॉर
गायरान जमिनीच्या कारणातून गेल्या दोन दिवसांपासून जकातवाडीतील व्हॉटस्अॅप ग्रुपवर शाब्दिक चकमक सुरू होती. यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. यापुढे एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली गेली. शाब्दिक वॉर सुरु असताना गुरुवारी राडेबाजीपर्यंत हे प्रकरण गेले. दरम्यान, गेल्यावर्षीही दोन गटांतील मुलांमध्ये भांडणे झाली होती. तो वाद मिटला, असे वाटत असताना धुसफुस मात्र सुरूच होती.