जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी

2 hours ago 1

चीनची अचानक नरमाईची भूमिका

हिंदुस्थान-चीन यांच्यातील संबंध फारसे सलोख्याचे राहिले नाहीत. चीनने तिबेट आणि झिंजियांगमध्ये 37 हेलिपोर्ट, हवाई अड्डे तयार केले आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करणे सुरूच केले आहे. परंतु आता चीनने अचानक नरमाईची भूमिका स्वीकारली असून हिंदुस्थानने आमच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहू नये, असे म्हटले आहे. चिनी सरकारचे मुखपत्र समजले जाणाऱया ग्लोबल टाइम्समध्ये एका अहवालामध्ये चीनने हे म्हटले आहे. हिंदुस्थानचे एअर चीफ मार्शल एपी सिंह यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून हे स्पष्टीकरण आले आहे.

हिंदुस्थानी एअर फोर्सची ‘पॉवर’

हिंदुस्थानी वायुदलाचा 92 वा वर्धापन दिन चेन्नईच्या तांबरम स्टेशनवर मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी एअर फोर्सच्या जवानांनी विविध प्रात्यक्षिके दाखवली. हिंदुस्थानी एअर फोर्स ही अमेरिका, चीन, रशिया या देशांनंतरची सर्वात मोठी चौथी एअर फोर्स आहे. हिंदुस्थानी एअर फोर्सची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून संपूर्ण देशात वायुदलाकडून विविध ठिकाणी एअर शो आणि परेड आयोजित केली जाते.

यूटय़ूबरने ठोकली 1.7 कोटींची कार

अमेरिकेतील प्रसिद्ध यूटय़ूबर आणि कंटेंट क्रिएटर्स जॅक डोहार्टी (20) याने सुपरकार चालवताना थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडक दिली. कार चालवत असताना तो लाइव्ह स्ट्रिमिंग करत होता. या सुपरकारची किंमत तब्बल 1.7 कोटी रुपये इतकी आहे. या कार अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून जॅकला मात्र फारशी दुखापत झाली नाही. जॅक हा धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गुगल वेबसाईटला मिळणार ब्ल्यू टिक

गुगलचा वापर करणाऱयांची संख्या कोटय़वधींच्या घरात आहे, परंतु आता गुगलने एक नव्या पॉलिसीत बदल करण्याचे ठरवले आहे. जगभरात इंटरनेटचा गैरवापर वाढल्याने याला आळा घालण्यासाठी गुगलने ही नवीन पॉलिसी आणली आहे. ऍपल वेबसाईट गुगलवर जाऊन सर्च करत असल्यास खरी वेबसाईटच्या पुढे आता ब्ल्यू टिक दिसणार आहे. त्यामुळे फेक वेबसाइटला ओळखणे सोपे जाणार आहे. ब्ल्यू टिक हे सर्वांसाठी केले जाणार नसून निवडक लोकांसाठी किंवा वेबसाईटसाठी केले जाणार आहे.

जगभरात इन्स्टाग्राम डाऊन; युजर्सचा तक्रारींचा पाऊस

इन्स्टाग्रामची सर्व्हिस मंगळवारी दोन ते तीन तास ठप्प झाली. सकाळी साडेअकरा वाजेपासून युजर्संना ही समस्या आली. असंख्य युजर्संनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाऊनडिटेक्टरवर इन्स्टाग्राम डाऊन असल्याची तक्रार केली. अनेक वापरकर्त्यांना ऍप लॉगिनमध्ये समस्या
आली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मस्क मैदानात

टेस्लाचे सीईओ एलन मस्क अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. कमला हॅरिस यांचा विजय अमेरिकेच्या भविष्यासाठी चांगला नाही. डोनाल्ड ट्रम्प हरले तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे ट्रम्प यांचे जिंकणे जरुरी आहे, असे वक्तव्य एलन मस्क यांनी केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एलन मस्क म्हणाले, ट्रम्पचा पराभव हा माझ्यासाठी मोठा झटका असेल. तुम्हाला काय वाटतं, माझी तुरुंगातील शिक्षा केवढी मोठी असेल. ते पुढे म्हणाले, लोकांना अवैध प्रवाशांना जाणूनबुजून काही राज्यांमध्ये आणले जात आहे.

स्पाइसजेटच्या ताफ्यात लवकरच 10 विमाने

एअरलाइन कंपनी स्पाइसजेट लवकरच आपल्या ताफ्यात 10 विमानांचा समावेश करणार आहे. पहिले विमान 10 ऑक्टोबरला ताफ्यात येणार आहे. मागील महिन्यात कंपनीला क्यूआयपीकडून 3 हजार कोटी रुपये मिळाल्यानंतर स्पाइसजेटकडून नव्या विमानांची घोषणा करण्यात आली होती. 15 नोव्हेंबरपर्यंत अन्य 7 विमाने ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱयांचे रखडलेले वेतन दिले होते.

नवे संकट! कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलरपार

मिडल इस्टमध्ये आलेल्या संकटामुळे क्रूड ऑइल (कच्चे तेल) च्या किमतीत जवळपास 4 टक्के वाढ झाली असून या ब्रेंटच्या किमती आता 80 डॉलरपार गेल्या आहेत. इराणवर इस्रायल हल्ला करण्याच्या भीतीने कच्चे तेल महागले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत एक दिवसापूर्वीच जवळपास 5 टक्के वाढ झाली आहे. या किमती 2 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. काही महिन्यांत तेलाच्या किमती 70 डॉलरपर्यंत घसरल्या होत्या.

मस्त! सोने-चांदीच्या दरात होतेय घसरण

सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी घसरण झाली. सोने 327 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी 1385 रुपयांनी घसरली. सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे 24 कॅरेट सोने 75,606 रुपये, तर 22 कॅरेट सोने 71 हजार रुपयांपर्यंत खाली आले. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने चांदी प्रति किलो 90 हजार 555 रुपयांपर्यंत खाली आली. सोमवारी चांदीचा भाव 91 हजार 940 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article