Published on
:
22 Nov 2024, 12:55 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:55 am
चिपळूण शहर : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक 69.04 टक्के इतके मतदान झाले. मागील काही निवडणुकांच्या तुलनेत हे सर्वाधिक मतदान झाले आहे. तालुक्यातील खेर्डी येथील केंद्रावर सर्वाधिक 89.72 टक्के मतदान तर संगमेश्वर कसबा येथील केंद्रावर सर्वात कमी 42.59 टक्के इतके मतदान झाले आहे.
मतमोजणी दि. 23 रोजी शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, एकूण मतदानापैकी 1 लाख 80 हजार 592 इतके मतदान झाले आहे. यामध्ये 95 हजार 816 पुरुष, तर 94 हजार 776 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, चिंचनाका ते बहादूरशेखनाका रस्ता वाहतुकीस बंद ठेवला जाणार आहे. विधानसभा निवडणूकीसाठी चिपळूण मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पेढे पानकरवाडी येथे रात्री 8 वाजेपर्यंत, तर मुंढे तर्फे चिपळूण येथील केंद्रावर रात्री 8.25 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.(Maharashtra assembly polls)
चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांतील 27 मतदान केंद्रांवर 80 टक्क्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. खेर्डी देऊळवाडी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक 89.72 टक्के मतदान झाले, तर संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे सर्वात कमी 42.59 टक्के मतदान झाले आहे. चिपळूण मतदारसंघात तीन केंद्रांवर 50 टक्क्कक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले.
मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी घेतलेल्या मॉकपोलमध्ये तीन मशिनमध्ये बिघाड झाला. त्यानुसार तत्काळ मशिनमध्ये बदल करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मतदानास सुरुवात झाल्यानंतर एकही मशिन बंद पडली नाही. संपूर्ण मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुस्थितीत पार पडली. सायंकाळी 6.30 वाजता पहिली मतदान पेटी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या केंद्रावर दाखल झाली, तर रात्री 11.30 संगमेश्वर धामापूर येथील मतदान पेटी सर्वात शेवटी दाखल झाली. मतदान पेट्या जमा करून रात्री 12.45 वाजता स्ट्राँगरूममध्ये सर्व मतपेट्या सील करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण भोसले आदी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.