Published on
:
21 Jan 2025, 1:31 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:31 am
पणजी : गोवा औद्योगिक विकास महामंडळा (जीआयडीसी) तर्फे औद्योगिक वसाहतींमध्ये महिलांसाठी 5 वसतिगृहे उभारण्यासाठीचा प्रकल्प अहवाल केंद्राला सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्या महिला व पुरुषांसाठी 5 वसतिगृहे बांधण्याची सरकारची योजना आहे. त्या अंतर्गत हा प्रकल्प अहवाल केंद्राला सादर करण्यात आल्याची माहिती जीआयडीसीच्या अधिकार्याने दिली.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या भांडवली गुंतवणूक 2024-25 योजनेसाठी राज्यांना विशेष साहाय्य अंतर्गत वसतिगृहे बांधण्यासाठी निधी मिळण्याची जीआयडीसीला आशा आहे. या वसतिगृहासाठी डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला होता आणि वित्त विभागाने तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्राकडे पाठवला होता, असे अधिकार्याने सांगितले.
वेर्णा येथील आयडीसीमध्ये महिला कामगारांसाठी दोन आणि मडकई, तुये आणि कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येकी एक वसतिगृह बांधायचे आहे. या वसतिगृहामुळे औद्योगिक क्षेत्रात, विशेषत: फार्मा इंडस्ट्री क्षेत्रात रात्रपाळीत काम करणार्या महिलांना फायदा होईल. त्यासाठी आम्ही 100 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. वसतिगृहे एकदा बांधल्यानंतर खासगी कंपनीला 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीवर करार करून चालवण्यास दिली जाणार आहेत.