पुणे: गुलेन-बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या तीन नवीन रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 173 झाली आहे. आत्तापर्यंत 72 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 55 रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आणि 21 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेद्वारे (व्हेंटिलेटर) उपचार घेत आहेत.
एकूण 173 रुग्णांपैकी 87 रुग्ण नव्याने समाविष्ट झालेल्या किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, धायरी या गावांमधील आहेत. उर्वरित 34 रुग्ण पुणे महापालिका, 22 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 22 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आहेत. इतर 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण 20 ते 29 या वयोगटांतील आहेत.
ब्रेन स्ट्रोक आणि जीबीएसचे निदान
गुरुवारी शहरातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. कर्वेनगरमधील वडारवस्ती येथील 63 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णाला ताप, जुलाब, चालण्यास त्रास आणि अशक्तपणा जाणवत होता. त्याला 28 जानेवारी रोजी नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयव्हीआयजी इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार सुरू होते. रुग्णास 5 फेब—ुवारी रोजी अत्यवस्थ वाटू लागल्याने पुढील अत्यावश्यक उपचार आणि सीपीआर देण्यात आला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णामध्ये ब—ेन स्ट्रोक आणि जीबीएसचे निदान झाले.
आत्तापर्यंत राज्यात 6 मृत्यू
राज्यात जीबीएसचे निदान झालेल्या 6 रुग्णांच्या मृत्यूची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. यांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला असून, एक मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील आहे. शहरातील 4 मृत्यू झालेले रुग्ण नांदेड, धायरी, नांदोशी, कर्वेनगर या भागातील आहेत. तर, एक रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी होता. सोलापूर जिल्ह्यात मृत्यू झालेला रुग्णही धायरी येथील रहिवासी आहे.