ठाकरेंची धारावीच्या 37 एकरांवर नजर:निर्बुद्ध आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते, भाजप नेते आशिष शेलार यांचा घणाघात

2 hours ago 1
उद्धव ठाकरे गटाला धारावी येथील नेचर पार्कचा 37 एकरांचा भूखंड बळकवायचा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी गुरुवारी केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख निर्बुद्ध असा करत ते शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते असल्याचाही आरोप केला. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्या आरोपांना गुरुवारी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ठाकरे कुटुंबाने मुंबईतील अनेक भूखंड बळकावलेत. आता त्यांची नजर धारावीमध्‍ये असणाऱ्या नेचर पार्कच्या 37 एकरांचा भूखंडावर आहे. आपल्या दुसऱ्या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून त्यांना आपल्या घराजवळची ही जागा बळकावयाची आहे, यामुळेच ते धारावीकरांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्‍य ठाकरे हे निर्बुध्‍दांसारखे अभ्‍यास न करता बोलत आहेत. धारावीमध्‍ये 70 टक्‍के दलित, मुस्‍ल‍िम आणि मराठी माणसे आहेत. त्‍यांना त्‍यांच्‍या हक्‍काची घरे मिळणार आहेत. तसेच मुंबई महापालिकेलाही 15 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईकरांना 430 एकरमधील 37 टक्के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यासारखी मोकळी जागा मिळणार आहे. एक वाहतूक हबही याच परिसरात उभा राहणार आहे. या प्रकल्पाद्वारे धारावीकरांसह संपूर्ण मुंबईकरांचा फायदा होत असताना आदित्‍य ठाकरे यांचा विरोध का? ते लोकांमध्‍ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करून धारावीकरांना हे सरकार तुमच्या विरोधी आहे असे वातावरण निर्माण करत आहेत. हा ठाकरे गट आणि आदित्‍य ठाकरे यांचा नरेटीव्‍ह सेट करण्‍याचा प्रयत्‍न आहे. हा एक आंतराष्‍ट्रीय कट असून आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्‍ते झाले आहेत, असे शेलार म्हणाले. यापुढे आमच्यावर कंत्राटदार प्रेमी असल्याचा आरोप होईल. पण त्‍याची तमा न बाळगता आम्‍ही आज मुंबई व मुंबईकरांच्‍या हिताचे आहे म्‍हणून सत्‍य मांडण्‍यासाठी बोलणार आहोत. जे मुद्दे आम्‍ही मांडतो आहे त्‍याची उत्‍तरे आदित्‍य ठाकरे यांनी आणि खासदार वर्षा गायकवाड आणि त्‍यांच्‍या पक्षांनी द्यावीत. आम्‍ही कधीही खुल्‍या चर्चेला तयार आहोत, असे आव्‍हानही त्‍यांनी त्यांनी यावेळी दिले. 7 लाखांचा आकडा कुठून आला? धारावीमध्ये घरे किती? सन 2000 आधीची किती? 2000 ते 2011 ची किती? औद्योगिक गाळे किती? याचा सर्वे अद्याप पूर्ण झालेला नाही. आमच्‍या माहितीप्रमाणे केवळ 20 हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा भाग बाकी असतानाही यासंबंधी संभ्रम व खोटे पसरवले जात आहे. कारण, आदित्य ठाकरे हे निर्बुद्ध आहेत. शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्‍ते आहेत. त्‍यांनी 7 लाख घरे असा काल जो उल्‍लेख केला तो आकडा आला कुठून? धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे निर्माण करण्याचे षडयंत्र आदित्य ठाकरे करीत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मशाल नावाच्या एका संस्थेने जो पहिला सर्वे केला तो अंतीम आम्‍ही नाही. पण त्‍या संस्‍थेने केलेल्‍या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 60 हजार घरे ही सन 2000 पूर्वीची आहेत. सरकारने सशुल्क संरक्षण दिलेली घरे 15 हजारांच्या आसपास असतील. दोन मजली अशी दीड ते दोन लाख घरे असावीत अशी आकडेवारी आमच्‍याकडे आहे. ही सर्वसाधारण माहिती आहे. त्‍यामध्‍ये कमी, जास्‍त होऊ शकते. मग महामानव भारतरत्‍न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानातला एक भाग म्हणून प्रत्येकाला घर मिळणार असेल तर आदित्य ठाकरे यांचा त्‍याला विरोध का? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांनी 1080 एकर जागा अदानीला दिल्याचा आरोप केला. अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत जर त्‍यांनी एक शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवला तर मी राजकारण सोडेन, अन्‍यथा त्‍यांनी राजकीय संन्‍यास घ्‍यावा. अभ्यास करून बोला, निर्बुद्ध आदित्य ठाकरे यांनी शहरी नक्षलवादाचे पपेट होऊ नये, असेही आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article